"हिरण्यकेशी'तून पाणी उपशाला यंदाही बंदी नाही

अजित माद्याळे
Thursday, 29 October 2020

ऑक्‍टोबर महिना संपत आला तरी अद्याप पाऊस माघार घेण्यास तयार नाही. हिरण्यकेशी नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह अजूनही मोठा आहे. साडेचार मीटरने बंधाऱ्यांमध्ये साठा होईल इतपत पाण्याचा प्रवाह आहे.

गडहिंग्लज : ऑक्‍टोबर महिना संपत आला तरी अद्याप पाऊस माघार घेण्यास तयार नाही. हिरण्यकेशी नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह अजूनही मोठा आहे. साडेचार मीटरने बंधाऱ्यांमध्ये साठा होईल इतपत पाण्याचा प्रवाह आहे. यामुळे चित्री प्रकल्पातील पाण्याचे पहिले रोटेशनही लांबणीवर पडणार आहे. म्हणूनच यंदाही उपसाबंदीची आवश्‍यकता भासणार नसल्याची चर्चा आहे. चित्रीच्या पाण्याचे नियोजन करणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

गतवर्षी महापूर आणि परतीच्या पावसाने उपसाबंदीची वेळ आली नव्हती. यंदा नोव्हेंबर महिना उजाडत आला तरी अद्याप परतीचा पाऊस थांबण्याचे नाव घेईना. यामुळे ओढे, विहिरी, कुपनलिकांना भरपूर पाणी आहे. जमिनीतील पाण्याची पातळीही गतवर्षीप्रमाणेच यंदाही वाढणार आहे. अजूनही जमिनीत प्रचंड ओलावा आहे. शेतवडीत पाणी थांबले आहे. यामुळे रब्बी हंगामातील शाळूची पेरणी लांबली आहे. ऊस लागणीचा हंगामही लांबण्याची शक्‍यता आहे. परिणामी, सध्या तरी पाण्याची आवश्‍यकता भासणार नाही. 

दरम्यान, यंदा बंधाऱ्यांमध्ये बरगे घालून पाणी अडवण्याची कार्यवाही पाटबंधारे विभागाकडून सुरू झाली होती. निलजी व खणदाळ बंधाऱ्यांमध्ये काही बरगेही घातले. परंतु दोन वेळा मुसळधार पाऊस झाल्याने नदीपात्रातील पाणी वाढले. यामुळे पाणी अडवण्याची कार्यवाही थांबली आहे. अजूनही नदीतून दीड ते दोन हजार क्‍युसेकने प्रवाह सुरू आहे. आणखीन चार-पाच दिवसांनी हा प्रवाह कमी झाल्यानंतर पाणी अडवण्याचे काम सुरू होईल.

पाण्याची मुबलकता असल्याने साडेचार मीटरवर पाणी अडवण्यात कोणतीच अडचण येणार नाही. एकीकडे पावसाच्या मुबलक पाण्याचा साठा बंधाऱ्यांमध्ये होणार आहे, आणि दुसऱ्या बाजूला वापर कमी होणार आहे. यामुळे हे पाणी जानेवारी अखेरपर्यंत पुरण्याची शक्‍यता आहे. म्हणून चित्री प्रकल्पातील पाण्याचे पहिले रोटेशन जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल, असे सांगण्यात येते. फेब्रुवारी ते मे या दरम्यानच्या रोटेशनमध्ये चित्रीतील पाणी पुरेल अशी परिस्थिती आहे. यामुळे उपसाबंदीची आवश्‍यकता भासणार नसल्याचे चित्र सध्याच्या वातावरणावरून पहायला मिळत आहे. 

उपसाबंदी न करता पाणी शिल्लक 
गतवर्षीच्या महापूर आणि पावसामुळे विहिरी, कूपनलिकांतील पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे नदीतील पाण्याचा वापर कमी झाला. जानेवारीच्या अखेरीस चित्रीतील पाण्याचा विसर्ग सुरू झाला. लाभक्षेत्राबाहेर कडलगेपर्यंत पाणी देवूनही गतवर्षी उपसाबंदी लागू केली नाही. असे असूनही जूनमध्ये चित्रीमध्ये 33 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला. यंदाची परिस्थिती गतवर्षीपेक्षा वेगळी नाही. यामुळे यंदाही उपसाबंदी होणार नसल्याचेच संकेत मिळत आहेत.  

 
संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abundant Water In Hiranyakesh River This Year Kolhapur Marathi News