स्मार्ट सिटी कामाचा आणखी एक बळी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

बसखाली सापडून विद्यार्थी ठार, भाग्यनगरातील घटना

बेळगाव : स्मार्टसिटीच्या अपूर्ण कामाचा आज आणखी एक बळी गेला. मोपेडवरून निघालेला विद्यार्थी बसखाली सापडून ठार झाल्याची घटना भाग्यनगर, दुसरा क्रॉस येथे घडली. 
तनय मनोज हुईलगोळ (वय १९, रा. भाग्यनगर, गोकुळनगर) असे त्याचे नाव आहे. यापूर्वीही स्मार्टसिटीच्या अपूर्ण कामामुळे अनेकांचा बळी गेला आहे. त्यात आता विद्यार्थ्यांचाही समावेश झाल्याने स्मार्टसिटीला आणखीन किती बळी हवेत, असा संतप्त प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला. 

अपघाताची नोंद दक्षिण वाहतूक पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, की तनय हा आज दुपारी ३.१० च्या सुमारास मोपेडवरून घराकडे निघाला होता. भाग्यनगर दुसरा क्रॉस येथील राऊळ फूड्‌सजवळ येताच अनगोळकडे जाणाऱ्या बसने त्याला धडक दिली. त्यामुळे तो सरळ जाऊन बसखाली सापडला. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला रिक्षातून रुग्णालयाकडे नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

 
अपघाताची माहिती समजताच वाहतूक दक्षिण पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीनिवास हंडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तनय हा गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये दुसऱ्या वर्षात शिकत होता. बेळगावातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट मनोज हुईलगोळ यांचा तो एकुलता मुलगा होय. त्याच्यावर शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

वाहतुकीसाठी धोकादायक रस्ता
चार महिन्यांपासून स्मार्टसिटीतून अनगोळ मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. अनगोळला जाणाऱ्या परिवहनच्या बस भाग्यनगरमार्गे वळविण्यात आल्या आहेत. त्यातच रस्त्याकडेला भाजी विक्रेतेही बसलेले असतात. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. स्मार्टसिटीच्या अपूर्ण कामामुळे यापूर्वीही अनेकांना जीव गमवावा लागला. त्यातच पुन्हा आज एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा बळी गेल्याने तीव्र संताप व्यक्‍त करण्यात आला.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident case in belgaum