
पुणे-बंगळूर महामार्गावर उचगाव रेल्वे पुलावर बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला.
गांधीनगर (कोल्हापूर) : मोटारसायकलला ट्रकने उडविल्याने मोटारसायकलवरील मायलेकरांचा मृत्यू झाला, तर पती व मुलगी जखमी झाले. आशाराणी अण्णाप्पा म्हेशाळे (वय ३०) आणि मुलगा आयुष अण्णाप्पा म्हेशाळे (वय ८ वर्षे, रा. हमाळी गल्ली, दर्गा चौक, मिरज. जि. सांगली) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत, तर पती अण्णाप्पा शिवाजी म्हेशाळे (वय ३५) आणि मुलगी अनुष्का अण्णाप्पा म्हेशाळे (वय६) हे जखमी आहेत.
पुणे-बंगळूर महामार्गावर उचगाव रेल्वे पुलावर बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबतची अधिक माहिती अशी की, अण्णाप्पा हे कणेरीवाडी (ता. करवीर) येथे देवदर्शनासाठी आपल्या कुटुंबीयांसमवेत मोटारसायकलवरून (एमएच. १० डीएम ८९६३) पत्नी आशाराणी आणि दोन मुलांसह निघाले होते. पुणे बंगळूर महामार्गावर उचगाव रेल्वे पुलाजवळ शिरोली एमआयडीसीमधून सिमेंट पोती खाली करून कागल एमआयडीसीत साखर भरण्यासाठी निघालेल्या ट्रक (केए ३२ डी ६४३५) ने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात आशाराणी व मुलगा आयुष रस्त्यावर खाली पडल्यावर आयुषच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला, तर आशाराणी यांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली.
हेही वाचा - आजऱ्यातील 22 गावात सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण -
मुलगी अनुष्का आणि अण्णाप्पा जखमी झाले. त्या सर्वांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच आशाराणी यांचा मृत्यू झाला. अपघाताच्या ठिकाणी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे महामार्गावरील ट्रॅफिक जाम झाले होते. जखमी अण्णाप्पा आणि मुलगी अनुष्का यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू असून, या घटनेची नोंद गांधीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे, याबाबत ट्रकचालक सय्यद मन्सूर अली (वय २९ वर्षे, रा.कोडली.ता.कालगी.जि. गुलबर्गा) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याबाबतचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अतुल कदम करत आहेत.
ॲम्बुलन्सचा विलंब बेतला जीवावर
आशाराणी म्हेशाळे या जखमी होऊन रस्त्यावरच विव्हळत पडल्या होत्या. ॲम्ब्युलन्स यायला उशीर झाल्याने त्यांना वेळेत उपचार मिळू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाला.
मुलगी व वडिलांनी फोडला हंबरडा
आयुषचा मृतदेह आणि आशाराणी यांची जखमी अवस्था पाहून मुलगी अनुष्का व अण्णाप्पा यांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा होता.
संपादन - स्नेहल कदम