व्यापाऱ्यांनो ‘जीएसटी’ भरा सहज आणि सोप्या पध्दतीने

लुमाकांत नलवडे
Saturday, 19 September 2020

कोल्हापुरात निर्मिती; सामान्य व्यापाऱ्यांना वापरास सुलभ, खर्च, वेळेची बचत
 

कोल्हापूर : कमी खर्चात, कमी वेळेत आणि बिनचूक काम करून ‘जीएसटी’ भरण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी आता कोल्हापुरात ‘लेखापाल’ सॉफ्टवेअर तयार झाले आहे. धान्य व्यापारी, मेडिकल, कॉन्ट्रॅक्‍टर, किराणा दुकानदार अशा सुमारे ५० हून अधिक व्यापाऱ्यांकडून हे सॉफ्टवेअर वापरले जाते. लवकरच हे सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये देण्याचा प्रयत्न कोल्हापुरातून सुरू झाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन तज्ज्ञ आणि दोन सी. ए. यांनी मिळून व्यापाऱ्यांसाठी हे सॉफ्टवेअर तयार केले. 

हेही वाचा- नरकेप्रेमी कार्यकर्त्यांना बाकी 9 नंबर आहे भलताच लकी

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर वाणिज्य शाखेतील कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित काम करूनच तो भरावा लागतो. मात्र, लघु उद्योजकांसह इतरांना त्यासाठी तज्ज्ञ किंवा इतर व्यवस्था करणे अवघड होत आहे. ही दरी लक्षात घेऊन ‘लेखापाल’ ही एक नवी संकल्पना पुढे आणली आहे. त्याला वाणिज्य शाखेतील सविस्तर ज्ञानाची आवश्‍यकता नाही. त्यामुळे या सॉफ्टवेअरला ‘लेखापाल’ असे नाव दिले आहे. सध्या बाजारात काही सॉफ्टवेअर आहेत, ती घेणे आणि वर्षाला त्याचे नूतनीकरण करणे, यासाठी पैसे द्यावे लागतात. 

हाताळण्यासाठी वाणिज्य शाखेतील व्यक्तीची गरज भासते. यावर मात करण्यासाठी ‘लेखापाल’ उपयोगी असल्याचे सी. ए. सतीश डकरे यांनी सांगितले.  विनय गुप्ते, जयराज सारदाळ हे दोघे आयटी सेक्‍टरमध्ये काम करतात; सतीश डकरे आणि गिरीश कुलकर्णी सी.ए. आहेत. त्यांनी हे सॉफ्टवेअर तयार केले असून, वेळ व पैसा वाचतो. तसेच, क्‍लिष्टताही कमी होत आहे, असे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा- नियमीत आहारात चिमूटभर हळदीचा वापर केल्याने होतात असे फायदे -

सॉफ्टवेअरबाबत...
  दुकानाच्या काउंटरवर सॉफ्टवेअरचा वापर शक्‍य
  रिटर्न भरण्याची व्यवस्थाही 
  ‘कर’ भरण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज नाही
  एसजीएसटी, आयजीएसटी, सीजीएसटी यांची स्वतंत्र प्रक्रिया
  कामकाज आणि हिशेब सोपा झाला आहे
  वार्षिक नूतनीकरणाची आवश्‍यकता नाही
  जिल्ह्यातील शंभर सीएंपर्यंत सॉफ्टवेअर पोचले
  डिसेंबर अखेर ५००० ग्राहकांपर्यत नेण्याचे उद्दीष्ट
  प्रोजेक्‍ट २०२१-२२ला पुण्यात सुरू करणार
  बीपीओ सेंटरच्या माध्यमातून सेवा देणार
  महा-ई प्रमाणे तालुका पातळीवर केंद्र सुरू करणार
  २०२१-२२ वर्षामध्ये सुमारे १० कोटींच्या उलाढालीचे उद्दीष्ट
  वार्षिक शुल्क भरल्यास सूट मिळणार
  डिसेंबर २०२२ पर्यंत तीन हजार लोकांना रोजगार देणार
  दोन कोटींपर्यंतच्या उलाढालीसाठी मासिक ५००, तर 
पाच कोटींपर्यंत १००० रुपये खर्च
 

जीएसटी भरण्यासाठीची कसरत कमी करण्यासाठी, तसेच क्‍लिष्टता कमी करून सोप्या पद्धतीने तो भरता यावा, यासाठीच्या सर्व उपाययोजना ‘लेखापाल’ सॉफ्टवेअरमध्ये केल्या आहेत. सध्या त्याचा वापर सुरू झाला असून, प्रत्यक्षात कामात काही त्रुटी येत नसल्याचे दिसून आले आहे. लवकरच मोबाईलवरच हे सॉफ्टवेअर आणण्याचे काम आता सुरू झाले आहे.
- सतीश डकरे, सीए

संपादन -  अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accountant software developed by two c. A. information technology and Together they created this software for merchants in Kolhapur