मोक्कामधील आरोपीने दिल्या पोलिसांच्या हातावर तुरी, गडहिंग्लज कोर्टातूनच ठोकली धूम....

The accused Sridhar Shingate escaped from the court while under arrest for the Moka crime
The accused Sridhar Shingate escaped from the court while under arrest for the Moka crime

गडहिंग्लज - मोक्का गुन्ह्याखाली अटकेत असलेला आरोपी श्रीधर अर्जून शिंगटे (रा. इंचनाळ, ता. गडहिंग्लज) हा आज येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयातून पसार झाला. दुपारी दीडच्या सुमारास फिल्मी स्टाईलने घडलेल्या या घटनेची चर्चा दिवसभर शहरात सुरू आहे. 

शिंगटे याच्याविरूद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी कोल्हापुरातील राजारामपूरी, जुना राजवाडा, गडहिंग्लज आणि आजरा पोलिस ठाण्यात त्याच्याविरूद्ध विविध गुन्हे दाखल झाले आहेत. 26 फेब्रुवारी 2019 रोजी उद्योजक रमेश रेडेकर यांना एक कोटीच्या खंडणीसाठी शिंगटे याने धमकी दिली होती. याप्रकरणी रेडेकर यांनी 27 फेब्रुवारीला त्याच्याविरूद्ध गडहिंग्लज पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर महिन्याने म्हणजे 26 मार्च 2019 रोजी शिंगटेला अटक केली आहे. तेंव्हापासून तो कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये आहे. त्याला प्रत्येक तारखेवेळी येथील न्यायालयात आणले जाते. आज येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात तारीख होती. कोल्हापुरातून त्याला सहायक फौजदार भारत बारटक्के यांनी स्वतंत्र वाहनातून येथे आणले होते. 

दुपारी दीडच्या सुमारास कोर्टातील तारीख अटोपल्यानंतर शिंगटेने नाष्टा करणार असल्याचे पोलिसाला सांगितले. त्यामुळे त्याला कोर्टातीलच कॅन्टीनमध्ये नेले. हातकडी असल्याने नाष्टा करता येत नसल्याचे सांगून शिंगटेने हातातील हातकडी काढा असे पोलिसाला सांगितले. हातकडी खोलल्यानंतर त्याने नाष्टाही अर्धवट खावून तो तो बील देण्याच्या बहाण्याने हळूहळू काऊंटरपर्यंत आला. तेथे आल्यानंतर तो जोराचा पळत सुटला. कॅन्टीनजवळच इमारतीला मागचा दरवाजा आहे. तेथून तो बाहेर पडून कोर्टाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून न्यायाधीशांचे निवासस्थान असलेल्या रोडवरून मागच्या बाजूने कोणाच्या तरी मोटरसायकलवरून त्याने धूम ठोकली. त्याच्यासोबत असलेले बारटक्के यांनी बाहेर येवून लोकांना व कोर्ट ड्युटीवरील पोलिसांना याची माहिती दिली. तातडीने पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावून घेवून त्याच्या मागे लावले. परंतु, तो पोलिसांना सापडला नव्हता. 

बघ्यांची गर्दी

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच बघ्यांची गर्दी झाली होती. कोर्ट आवार आणि शहरात या घटनेचीच चर्चा सुरू होती. पोलिस उपअधीक्षक अंगद जाधवर, पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशिद हे कोर्टात दाखल झाले. पोलिस कुमक मागवून घेतली. त्यांना तपासाबाबत मार्गदर्शन करून वेगवेगळ्या ठिकाणी पोलिस पथकांना रवाना करण्यात आले. मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल झालेला आरोपी पळून जाण्याचा हा येथील कोर्टातील पहिलाच प्रसंग आहे. या घटनेने खळबळ उडाली असून शिंगटेच्या शोधासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. 

चप्पल टाकून पसार

मुळात आरोपीच्या पायात चप्पल नसतात असे सांगण्यात येते. परंतु, शिंगटेकडे चप्पल कोठून आली हा संशोधनाचा विषय आहे. त्याला पळण्यासाठी चप्पलचा अडथळा होत असल्याने त्याने कोर्ट इमारतीच्या बाहेरच समोरच्या बाजूला चप्पल टाकून त्याने धूम ठोकली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com