आजऱ्यात बाजारपेठ जीवनावश्‍यक वस्तूंसाठी खुली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

कोरोना संशयावरून शहरातील एकाला उपजिल्हा रुग्णालयाकडे दाखल केल्याने शहरासह तालुक्‍यात खळबळ उडाली होती. गेले तीन दिवस बाजारपेठ कडकडीत बंद होती. आज त्या तरुणाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी आज बाजारपेठ खुली झाली. प्रशासनाने यासाठी सवलत दिली होती. त्यामुळे बाजारपेठेत थोडीफार वर्दळ दिसून आली. 

आजरा : कोरोना संशयावरून शहरातील एकाला उपजिल्हा रुग्णालयाकडे दाखल केल्याने शहरासह तालुक्‍यात खळबळ उडाली होती. गेले तीन दिवस बाजारपेठ कडकडीत बंद होती. आज त्या तरुणाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी आज बाजारपेठ खुली झाली. प्रशासनाने यासाठी सवलत दिली होती. त्यामुळे बाजारपेठेत थोडीफार वर्दळ दिसून आली. 
दिल्ली येथे तबलीगला गेलेल्या एका तरुणाला तो आजारी असल्याच्या संशयावरून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा स्वॅब मिरज येथील कोरोना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला होता. आज त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरवासीयांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. तीन दिवसांच्या काळात प्रशासनाच्या पातळीवर मोठी सतर्कता घेण्यात आली होती. तो राहत असलेल्या दर्गा गल्लीतील आजरा-महागाव मार्गाचा सुमारे अर्धा किलोमीटरचा परिसर "सील' केला होता. त्यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंची दुकानेही बंद होती. आज मात्र सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत बाजारपेठ जीवनावश्‍यक वस्तूंसाठी खुली ठेवण्यात आली. बाजारात सोशल डिस्टन्स ठेवून नागरिक खरेदी करताना दिसत होते. कुठेही गर्दी होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेतली होती. तहसीलदार विकास अहिर, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्‍य पाटील यासह अधिकारी बाजारपेठेत तळ ठोकून होते. 

आठवडी बाजार बंदच 
शुक्रवारी आजऱ्याचा आठवडी बाजार प्रशासनाकडून रद्द करण्यात आला आहे. सलग चौथा आठवडी बाजार रद्द करण्यात येत आहे. गर्दी होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajara market is open for essential commodities Kolhapur Marathi News