वारंवार चर्चेत असणाऱ्या क्रीडा संकुलाचे विघ्न काही संपेना

सुयोग घाटगे 
Tuesday, 24 November 2020

वसतिगृहाला कागदोपत्री मंजुरी; प्रत्यक्ष कामाबाबत प्रशासकीय पातळीवर अनास्था

कोल्हापूर : रेसकोर्स नाका येथील छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलातील अनेक कामांना मंजुरी मिळूनही लॉकडाउनने प्रत्यक्षात कामांना सुरवात झालेली नाही. येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहाची अनेक पातळीवर चर्चा झाली. तरीही प्रत्यक्ष कामाबाबत मात्र प्रशासकीय पातळीवर अनास्था दिसून येत आहे. 

तब्बल १० वर्षांपासून सुरू असणारे काम आणि कामातील त्रुटींमुळे वारंवार चर्चेत असणाऱ्या क्रीडा संकुलाचे विघ्न काही संपत नाही. यावर मात्रा शोधण्यासाठी म्हणून संकुलाचा विकास आणि अत्यावश्‍यक असणाऱ्या बाबी तातडीने पूर्ण करण्यासाठी येथील संबंधित अधिकाऱ्यांनी ॲक्‍शन प्लॅन तयार केला. शासन दरबारी याची मंजुरीही मिळाली. मात्र, अचानक झालेल्या लॉकडाउनमुळे येथील अनेक मंजूर विकासकामे निव्वळ कागदोपत्री शिल्लक राहिली आहेत. या संकुलात अधिकाधिक सुविधा व्हाव्यात आणि राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा घेण्यासाठी हे क्रीडा संकुल सज्ज असावे या दृष्टीने पावले टाकण्याकडे प्रशासकीय पातळीवर सुरुवात झाली होती.

हेही वाचा- शिक्षकांना रंगीत पार्टी पडली चांगलीच महागात; बसला ८३ हजार रुपये दंड -

वर्षभरात या संकुलातील प्रत्येक जागा  १०० टक्के खेळासाठी आणि खेळाडूंसाठी उपलब्ध होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली होती. यामध्ये प्रामुख्याने वसतिगृहाची मंजुरी घेतली होती. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा येथे झाल्यास खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांसाठी राहण्याची व्यवस्था असणे आवश्‍यक असते. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या राज्य स्पर्धांवेळी विविध जिल्ह्यातून आलेल्या स्पर्धकांची शहरातील विविध हॉटेलमध्ये थांबण्याची व्यवस्था करावी लागली होती. तसेच प्रवासातही अधिक वेळ खर्ची पडत होता. या सर्व गोष्टींचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होत असतो. यामुळे संकुलाच्या परिसरामध्येच वसतिगृह असल्यास खेळाडूंना याचा फायदा होतो. शिवाय राष्ट्रीय स्पर्धा घेण्यासाठीही याचा फायदा होईल. या प्रस्तावानुसार या वसतिगृहाला कागदोपत्री मंजुरी मिळाली असून, लॉकडाउन कालावधीत हे काम सुरू करण्याची संधी मात्र साधली नाही.

 

कोल्हापूरच्या या क्रीडासंकुलामध्ये अधिकाधिक सुविधा प्राप्त व्हाव्यात आणि या ठिकाणी अधिकाधिक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा होण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे. लॉकडाउनमुळे काही तांत्रिक बाबी पूर्ण होणे शक्‍य झाले नाही. मात्र, या क्रीडा संकुलामधील त्रुटी दूर करणे हे प्रशासनाचे प्रथम ध्येय असेल यासाठीचे काम सध्या सुरू आहे.
- डॉ. माणिक ठोसरे, विभागीय क्रीडा उपसंचालक

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apathy at the administrative level Chhatrapati Sambhaji Maharaj Divisional Sports Complex