चिक्कोडी जिल्हा घोषित न केल्यास प्राण त्याग आंदोलन करणार ; बी. आर. संगाप्पगोळ  

राजेंद्र कोळी
Thursday, 19 November 2020

चिक्कोडी जिल्हा घोषित न केल्यास चिक्कोडी जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने प्राणत्याग आंदोलन हाती घेण्यात येणार आहे

चिक्कोडी  : बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून येत्या काही दिवसात चिक्कोडी जिल्हा घोषित न केल्यास चिक्कोडी जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने प्राणत्याग आंदोलन हाती घेण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी व सरकारच्या विरोधात जिल्हा समितीचे कार्यकर्ते विविध पातळीवर चळवळ करण्यास सज्ज असून आता जिल्ह्यासाठी प्राणांची बाजी लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आंदोलन समितीचे अध्यक्ष बी. आर. संगाप्पगोळ यांनी दिली.

येथील सरकारी प्रवासी मंदिरात आज (ता. १९) ते पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, चिक्कोडी जिल्ह्याची घोषणा करावी या मागणीसाठी या भागातील नागरिक दोन दशकापासून आंदोलन करीत आहेत. पण जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या ईच्छाशक्तीअभावी चिक्कोडी जिल्ह्याची निर्मिती रखडली आहे. चिक्कोडी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी डिसेंबरपूर्वी चिक्कोडी जिल्ह्याची घोषणा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणावा. जिल्हा संघर्ष समिती येत्या काळात लोकप्रतिनिधींच्या घरासमोर धरणे आंदोलने हाती घेणार आहे. त्यालाही लोकप्रतिनिधी व सरकारने प्रतिसाद न दिल्यास रेल्वे व रास्तारोको चळवळ हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतरही चिक्कोडी जिल्ह्याची घोषणा न केल्यास लोकप्रतिनिधींच्या घरासमोर जिल्ह्यासाठी प्राणत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी चिक्कोडीत आपल्याला लोकसभेवर निवडून दिल्यास चिक्कोडी जिल्ह्याची निर्मिती करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्यासपीठावरून दिले होते. पण आजवर चिक्कोडी जिल्हा निर्मितीसाठी त्यांनी कोणतेही पाऊल उचललेले नाही. निवडणुकीनंतर त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला असल्याचे बी. आर. संगाप्पगोळ यांनी सांगितले.

हे पण वाचाहृदयद्रावक : केवळ उपचार न मिळाल्याने मातेसह बाळाचा मृत्यू

चिक्कोडी जिल्ह्याची घोषणा होईपर्यंत घोषणा केलेल्या विजयनगर नव्या जिल्ह्याची निर्मिती मुख्यमंत्र्यांनी प्रलंबित ठेवावी अशी मागणी करण्यात केली. यावेळी एस. वाय. हंजी, एम. ए. पाटील, बी. ए. पाटील, सुरेश ब्याकुडे, तुकाराम कोळी उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: B R Sangappagol warns Karnataka government for declaration of Chikkodi district