कुलगुरूंच्या दालनातच अ.भा.वि.पचे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

परिषदेचे कार्यकर्ते सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील कुलगुरूंच्या दालनाबाहेर आले

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ पूर्ववत सुरू करा. या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज विद्यापीठात आंदोलन केले. त्यांनी कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांच्या दालनातच ठिय्या आंदोलन केले. आपल्या मागणीचे निवेदन त्यांनी कुलगुरूंना दिले. 

परिषदेचे कार्यकर्ते सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील कुलगुरूंच्या दालनाबाहेर आले. त्यांनी कुलगुरूंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी तेथील सुरक्षा रक्षकांनी कुलगुरू मिटिंगमध्ये असल्याचे सांगितले. त्यानंतर परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोर्चमध्ये बसूनच घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर कुलगुरू मिटींगमधून बाहेर आले व त्यांनी त्यांच्या दालनामध्ये कार्यकर्त्यांना बोलावले. मात्र कार्यकर्ते कुलगुरूंच्या दालनामध्येच जमिनीवर बसले. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी कुलगुरूंना दिले. 

निवेदनातील माहितीनुसार, जानेवारी महिना सुरू झालेला असताना, सर्व मद्यालये (बिअर बार), मंदिरे, प्रेक्षागृह, चित्रपटगृह सुरू झालेले असताना विद्येचे मंदिर असणारे महाविद्यालय व विद्यापीठ परिसर देखील तात्काळ विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात यावा. विद्यापीठ परिसरामध्ये "उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर" यानावे शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा कार्यक्रम होतो, त्या कार्यक्रमाला कुठल्याही स्वरूपाचे सोशल डिस्टन्स व कोविड नियमांचे पालन झाले नाही. एकीकडे असे उपक्रम होतात. पण विद्यापीठ सुरू केले जात नाही. त्यामुळे सुजाण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. राज्यात मंदिरे सुरू झाली. बार सुरू झाले पण अजून विद्यापीठ सुरू झालेले नाही. तात्काळ विद्यापीठ पूर्ववत सुरू करावे. 

या आंदोलनात अभाविपचे महानगर मंत्री ऋषिकेश माळी, महानगर सहमंत्री अथर्व स्वामी, जिल्हा गतीविधी राहुल बुडके, जिल्हा समिती सदस्य पूर्वा मोहिते, नारायण धस, अद्वैत पत्की आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
शासनाच्या निर्देशानुसार विद्यापीठातील शैक्षणिक कामकाज पूर्ववत सुरू करण्यासाठी एक समिती नेमली आहे. समिती जिल्हाधिकाऱ्यांना आपला अहवाल देईल. त्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार विद्यापीठातील अधिविभागांमध्ये पूर्वीप्रमाणे प्रत्यक्ष अध्यापनाचे काम सुरू होईल. 
- प्रा.डॉ.डी.टी.शिर्के (कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ) 
                      
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a b v p students protest in shivaji university