दिवसभर प्लंबिंगचे काम, रात्री हार्मोनियमचे सूर छेडत  तब्बल २१ वर्षे अंधश्रद्धेवर प्रहार करत भजनात रंगले कुटुंब

baban shinde story by sandeep kandekar kolhapur
baban shinde story by sandeep kandekar kolhapur

कोल्हापूर : दिवसभर प्लंबिंगच्या कामात घाम गाळायचा, रात्री हार्मोनियमचे सूर छेडताना भक्तिरसात न्हाऊन जायचे, अंधश्रद्धेवर प्रहार करीत प्रबोधनाचा वारसा चालवायचा, एक-दोन वर्षे नव्हे तर तब्बल २१ वर्षे बबन शिंदे यांचा हा प्रवास अथकपणे सुरू आहे. पत्नी सुजाता, मुलगी माधुरी व मयूरी यांचाही गोड स्वर भक्तिरसाला साज चढवत आहे. अख्ख शिंदे कुटुंबच  असून, भजनी स्पर्धेतही त्यांनी यशाचा झेंडा फडकावला आहे. 

 शिंदे मूळचे राधानगरी तालुक्‍यातील वाळव्याचे. सध्या ते कळंबा येथे राहतात. त्यांचे आजोबा दादू नलवडे शाहीर, तर वडील गणपत शिंदे शाहू मिल गिरणीत कामगार. दहावीपर्यंत शिकलेल्या शिंदे यांनी प्लंबर म्हणून काम सुरू केले. अध्यात्माची आवड स्वस्थ बसू देत नसल्याने त्यांनी जगद्‌गुरू नरेंद्राचार्याजी भजनी मंडळाची स्थापना केली. हार्मोनियमच्या शिक्षणासाठी कोठे क्‍लास न लावताच त्यांच्या बोटांत स्वर बसले. भक्तिगीतांसह लोकगीतांतून त्यांनी प्रबोधन सुरू केले. पत्नी सुजाता, दहावी शिकलेली माधुरी व एफ.वाय.बी.ए. झालेली मयूरी यांनाही भजनाची गोडी लागली. माधुरी व मयूरी यांनी ब्यूटीपार्लरचा कोर्सही पूर्ण केला आहे.  

शासनातर्फे औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूरमध्ये त्यांनी प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. पश्‍चिम महाराष्ट्र भजनी मंडळ स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. निगवे येथे २००६ व २००७ मध्ये झालेल्या स्पर्धेत सलग दोन वर्षे प्रथम, तर २००८ मध्ये चंद्रे येथे झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर उमटवली. नानीज, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूरसह अन्य जिल्ह्यांत त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. 
सदस्य असे : शिवाजी चव्हाण (अध्यक्ष), हरी सुतार (उपाध्यक्ष), अशोक चोडणकर (सचिव), बबन शिंदे, उदय भालकर, सुजाता शिंदे, माधुरी शिंदे, मयूरी शिंदे, युवराज गायकवाड. 

लिंबू, टाचण्या, दहीभाताच्या अंधश्रद्धेत समाज अडकला आहे. त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रबोधनात्मक भजनाचे कार्यक्रम सादर करतो. 
- बबन शिंदे

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com