
गेल्या दहा महिन्याच्या काळात कोरोना संसर्ग जिल्हाभरात पसरला आहे.
कोल्हापूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत कोविशिल्ड लसीकरणाला आज सुरुवात झाली. सीपीआर रुग्णालयात हृदयविकार तज्ञ डॉ. अक्षय बाफना यांना पहिली लस देण्यात आली.आमदार चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे लसीकरण सुरू झाले.दिवसभरात सीपीआर केंद्रावर 100 व्यक्तींना कोवि शील्ड लस देण्यात येणार आहे. याचबरोबर कोल्हापूर शहरातील सेवा रुग्णालय, महापालिकेचे सावित्रीबाई फुले रुग्णालय, पंचगंगा हॉस्पिटल, महाडिक मळा हॉस्पिटल, राजारामपुरी हॉस्पिटल आदी ठिकाणी हे लसीकरण होईल.
गेल्या दहा महिन्याच्या काळात कोरोना संसर्ग जिल्हाभरात पसरला आहे. अशात कोरोना बाधितांना शोधून त्यांच्यावर उपचार करणे व उपचारानंतर सुरक्षित रित्या घरी पोहोचणे या सर्व कामांमध्ये आरोग्य विभागाचे जे डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी कोरोना उपचार सेवेत होते अशांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे.
हेही वाचा- ‘प्रचाराची वेळ संपली आहे आणि तुम्ही आता असे चिन्ह दाखवू शकत नाही'
गेले दहा दिवसापूर्वी प्रतिबंधक म्हणजेच कोविशील्ड लसीकरणाचा ड्रायरन यशस्वी झाला होता.त्याच धर्तीवर आज सीपीआर रुग्णालयात मध्ये प्रत्यक्ष लसीकरण सुरू झाले सीपीआरच्या कोयना इमारतीत तिसऱ्या मजल्यावरील तीन कक्षात तीन टप्प्यात हे लसीकरण झाले. पहिल्यांदा कोविन ॲपवर लसीकरण लाभार्थ्याची नोंद झाली. त्यानंतर ऑक्सीजन पातळी तसेच रक्तदाब यांची तपासणी झाली व त्यानंतर प्रत्यक्ष लसीकरण झाले या लसीकरणानंतर संबंधित लाभार्थ्यांना अर्ध्या तासाची विश्रांतीही देण्यात आली.
पहिल्या लसीकरणात बधिरीकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. उल्हास मिसाळ यांनी डॉ बाफना यांना पहिली लस दिली. त्यानंतर डा बाफना यांना विश्रांती कक्षात विश्रांती देणे सुरु झाले या पाठोपाठ सीपीआरमधील आरोग्य कर्मचारी यांना हे लसीकरण सुरू झाले.डॉ. अपराजित वालावलकर यांनी या लसीकरनाला तांत्रिक सहकार्य केले. यावेळी राजश्री शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ श्रीरंग बर्गे, डॉ महेंद्र बनसोडे, डॉ उल्हास मिसाळ, डॉ गिरीश कांबळे यांच्यासह रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
संपादन- अर्चना बनगे