सरपंच नितिन पाटील यांच्या प्रतिमेचे पु़जन करून बाबासाहेब खोत यांनी घेतला सरपंच पदाचा पदभार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

 बाजारभोगावच्या सरपंचपदी बाबासाहेब खोत , उपसरपंचपदी प्रकाश पोवार

बाजारभोगाव  (कोल्हापूर) :  पन्हाळा तालुक्यातील  बाजारभोगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बाबासाहेब श्रीपती खोत  व उपसरपंचपदी प्रकाश रंगराव पोवार यांची बिनविरोध निवड झाली. पहिले लोकनियुक्त व लोकप्रिय सरपंच दिवंगत नितिन पाटील यांची प्रतिमा सरपंचपदाच्या खुर्चीत ठेवत , स्वतः साध्या खुर्चीवर बसून श्री . खोत यांनी कार्यभार स्वीकारताच संपूर्ण सभागृह गलबलून गेले. बाजारभोगावचे मंडल अधिकारी बी. एस. खोत यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून  काम पाहिले. 

लोकनियुक्त सरपंच नितिन पाटील यांच्या  निधनामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी ,तर मनिषा खोत यांनी उपसरपंचपदाच्या मुदतपूर्व दिलेल्या राजीनाम्यामुळे बाजारभोगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदासाठी आज  निवडणुक झाली.राज्य शासनाच्या लोकनियुक्त सरपंचपद रद्द करण्याचा अध्यादेशानुसार येथील सरपंच, उपसरपंच निवड ही ग्रामपंचायत सदस्यांमधून घेण्याचे परिपत्रक प्रशासनाने काढले होते.

त्यामुळे आपल्याच गटातील सदस्यास सरपंचपद मिळावे, म्हणून स्थानिक नेत्यांनी चांगलीच कंबर कसली होती.  बाबासाहेब खोत यांच्यासह अपर्णा भोगावकर , रोहन गुरव , श्वेता कांबळे  आदींची नावे चर्चेत होती.त्यानुसार , गत काही दिवस येथे नाट्यमय राजकीय घडामोडी सुरु होत्या. तथापी , आजच्या निवड सभेस अपर्णा भोगावकर , अमोल गवळी , श्वेता कांबळे हे सदस्य गैरहजर राहिले.  

हेही वाचा- नारायण राणे नावाचा दबदबा कायम ; सत्ता असो की नसो -

 सरपंचपदासाठी बाबासाहेब खोत, तर  उपसरपंचपदासाठी प्रकाश पोवार यांचेच अर्ज दाखल झाल्यामुळे अध्यासी अधिकारी बी.एस. खोत यांनी  बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. ग्रा. पं. सदस्य रोहन गुरव, नर्मदा पाटील, सविता नाईक, मनिषा खोत , योगेश निवड प्रक्रियेत सहभागी झाले. तलाठी अनिल पर्वतेवार, ग्रामसेवक सुभाष पाटील. पोलिसपाटील छाया पोवार , संदीप पाटील, सतीश पाटील. अॕड मोहन पाटील, माजी जि प सदस्य आनंदा कांबळे, दत्तात्रय शिंदे उपस्थित होते.

दरम्यान, नितीन पाटील यांची प्रतिमा सरपंचपदाच्या खुर्चीवर ठेवत स्वतः साध्या खुर्चीवर बसून आपली यापुढील कारकीर्द नितिन पाटील यांच्याच विचारावर बेतलेली असेल , असे नूतन सरपंच श्री. खोत यांनी सूचित करताच सभागृहातील उपस्थितांचे डोळे पानावले ,तर अनेकांचे कंठ दाटून आले. 

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Babasaheb Khot as Sarpanch of Bajarbhogav, Prakash Pawar as Deputy Sarpanch