
स्वच्छतागृह मोफत असून शौचालयाचा वापर केल्यास पाच रूपये आकारणी केली जात असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोल्हापूर : सुलभ शौचालयासह ड्रेनेजची झाकणे, शेडची सडलेले खांब अशा विविध समस्यांनी कपिलतीर्थ मार्केटमधील भाजीपाला विक्रेते ग्रासले आहेत. स्वच्छतागृहासाठी पाणी उपसा करणाऱ्या यंत्रणेत अडथळे निर्माण झाल्याने पाण्याच्या बाटल्या घेऊन महिलांना स्वच्छतागृहात जाण्याची वेळ आली आहे. दोन ते तीन दिवसांपासून बंद असलेल्या स्वच्छतागृहाचे दरवाजे उघडले; पण दुर्गंधी पसरल्याची तक्रार व्यापारी तसेच विक्रेत्यांनी केली.
स्वच्छतागृह मोफत असून शौचालयाचा वापर केल्यास पाच रूपये आकारणी केली जात असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. महापलिकेला महिन्याला पावणेदोन लाखाहून अधिक रमा फी जमा करूनही सुविधांअभावी विक्रेत्यांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. मार्केटच्या मध्यभागी स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे. येथे सातत्याने वर्दळ असते. जुन्या आडातील पाणी मोटारीने आणले जाते. आडाची स्वच्छता न झाल्याने पाणी खराब झाले आहे. पाणी उपसा करणारी मोटार कमी अश्वशक्तीची असल्याने पुरेशा दाबाने पाणी खेचले जात नाही. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या भरून पाणी आणण्याची वेळ महिला विक्रेते तसेच पर्यटकांवर आली आहे. दुर्गंधीमुळे गिऱ्हाईक मंडईच्या काही भागात फिरकत नसल्याचे विकेत्यांचे म्हणणे आहे. मार्केटच्या पूर्वेला लोखंडी शेड आहे त्याचा पाया निखळू शकतो, असे चित्र आहे. शेड कोसळून दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न केला जात आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळाची व्यवस्था ज्या ठिकाणी आहे, तेथे ड्रेनेजच्या झाकणाचा प्रश्न आहे. बाजुला असलेल्या चेंबरमध्ये कधी कोणाचा पाय घसरून तोल जाईल याचा नेम नाही.
..तर शौचालय आम्ही चालवू
कपिलतीर्थ मार्केटमध्ये सुलभ शौचालय नीट चालवत येत नसेल तर आम्ही चालवू, पण यापुढे अस्वच्छता खपवून घेणार जाणर नाही, असा इशारा व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष संदीप वीर यांनी दिला. आयुक्तांना निवेदन दिले आहे. प्रदीप इंगवले, अजित खतकर, अभिजित गुरव, मनोज शेख, मनोज जाधव, गणेश ढेरे, प्रमोद सासने आदी व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला.
महापालिकेच्या शौचालयाची स्वच्छता आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे. तरीही नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून खबरदारी घेतली आहे.
- गीता लखन, सहायक आरोग्य निरीक्षक, महापालिका
सुलभ शौचालयाच्या कामात काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. लोकांची गैरसोय दूर करण्यासाठी लवकरच हे काम पूर्ण करणार आहे.
- संजय लखन, ठेकेदार
संपादन - धनाजी सुर्वे