कौलगेतील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ४८ लाखांचा घोटाळा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

व्यवस्थापकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा 

गडहिंग्लज (कोल्हापूर)  : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील श्री कल्लेश्‍वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ४८ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेचा व्यवस्थापक सुनील धोंडिबा पोवार (कौलगे) याच्याविरुद्ध आज गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. विचारणा केल्यावर त्याने ही रक्कम परत भरली असली तरी एवढी मोठी रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप लेखापरीक्षकांनी त्याच्यावर ठेवला आहे.

पोलिसांनी सांगितले, १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१९ या दरम्यान सुनिल पोवार हा कल्लेश्‍वर पतसंस्थेत मॅनेजर म्हणून सेवेत होते. या कालावधीत सभासद कर्ज, ठेवतारण कर्ज, सोने तारण कर्ज, स्थावर तारण कर्ज, मुदतबंद ठेव व या ठेवींच्या फरकापोटी जमा केलेल्या रकमा संस्थेच्या दप्तरी नोंदवल्या; परंतु किर्दीला जमा न घेता त्या स्वत:च्या कामासाठी वापरल्या. काही वेळेस पुनर्गुंतवणूक केलेल्या रकमेची नोंदही खात्यावर घेतली; परंतु या गुुंतवणुकीच्या पावतीची नोंद किर्दीला घेतली नाही. या माध्यमातून एकूण ४८ लाख ११ हजार ६३७ रुपये इतक्‍या निधीचा गैरवापर स्वत:च्या फायद्यासाठी केल्याचे स्पष्ट होताच संचालक मंडळ आणि लेखापरीक्षकांनी विचारणा केल्यानंतर पोवार याने या रकमेचा भरणा केला. 

हेही वाचा- साखर उद्योगाला दिलासा ; इथेनॉल दरवाढीवर केंद्राची मोहोर -

मात्र, वरील कालावधीसाठी ही रक्कम स्वत:साठी वापरल्याचा आरोप मॅनेजर पोवारविरुद्ध आहे. लेखापरीक्षक दयानंद पोवार (रा. ऐनापूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bank fraud case Embezzlement of Rs. 48 lakhs in Kaulage credit union