बटकणंगले रस्त्याला पंधरा वर्षानंतरही डांबर नाही

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 March 2021

पंधरा वर्षापूर्वी डांबरीकरण झालेल्या बटकणंगले-मांगनूर तर्फ सावतवाडी-जांभूळवाडी- दुगूनवाडी या रस्त्याच्या नशिबात पुन्हा डांबर कधी पडणार? असा प्रश्‍न या मार्गावरील नागरिक, वाहनधारक विचारत आहेत.

गडहिंग्लज : पंधरा वर्षापूर्वी डांबरीकरण झालेल्या बटकणंगले-मांगनूर तर्फ सावतवाडी-जांभूळवाडी- दुगूनवाडी या रस्त्याच्या नशिबात पुन्हा डांबर कधी पडणार? असा प्रश्‍न या मार्गावरील नागरिक, वाहनधारक विचारत आहेत. पंधरा वर्षापासून हा रस्ता दुर्लक्षित राहिला आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून या रस्त्याला डांबरीकरणाचा मुलामा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. 

बटकणंगलेपासून सुरु होणारा हा रस्ता मासेवाडी तिट्ट्यावरुन दुगूनवाडीला जातो. दहा किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. तत्कालीन आमदार स्व. बाबा कुपेकर यांच्या प्रयत्नातून दुर्गम भागातील हा रस्ता दोन वेळा झाला होता. त्यानंतर मात्र या रस्त्यावर डांबरच पडला नाही. पंधरा वर्षापूर्वी झालेल्या या रस्त्यावर अजूनही डांबर नाही. हजारो खड्डे या रस्त्यावर पडले आहेत. किरकोळ डागडुजी करुन बांधकाम विभागाने केवळ नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे छोटे-मोठे अपघात होत आहेत. या रस्त्यावरुन वारंवार ये-जा करणाऱ्यांना खड्ड्यांमुळे शारिरीक त्रास सुरु झाला आहे. परंतु, बांधकाम विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. नागरिकांनी वेळोवेळी मागणी करुनही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. विचारणा केल्यानंतर रस्त्यासाठी आवश्‍यक निधी उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले जाते. यामुळे या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही, अशी विचारणा नागरिक करीत आहेत. आता बांधकाम विभागाकडून काहीच हालचाल न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा मांगनूर तर्फ सावतवाडीचे उपसरपंच प्रकाश पाटील यांनी दिला आहे. 

रस्ता वर्ग करावा... 
जि. प. बांधकाम विभागाकडील हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठी आमदार राजेश पाटील, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी पत्रव्यवहार केल्याचे सांगण्यात येते. परंतु शासनाकडून अजूनही त्याची कार्यवाही झालेली नाही. यामुळे तत्काळ हा रस्ता सार्वजनिकडे वर्ग करावा अशी मागणीही उपसरपंच प्रकाश पाटील यांनी केली आहे. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Batakangale Road Neglected Even After Fifteen Years Kolhapur Marathi News