कळतय पण वळत नाही : बेडसाठी दिवसभर; इंजेक्‍शनसाठी रात्रभर अन् मास्क मात्र हनुवटीवरच

डॅनियल काळे
Monday, 7 September 2020

लोकांना कळेना गांभीर्य; बेफिकीर वागण्यामुळे कोरोनाविरुद्धची लढाई होतेय अवघड

कोल्हापूर : मास्क तोंडावर, नाकावर नाही; तर हनुवटीलाच, सोशल डिस्टन्सिंग म्हणण्यापुरते आणि सॅनिटायझर दाखविण्यापुरतेच, अशी स्थिती शहरात ठिकठिकाणी असल्याने कोरोना संसर्ग वाढत आहे. विशेषत: मार्केट प्लेस, कमर्शिअल ठिकाणे आणि गर्दीच्या ठिकाणी ही दृश्‍ये सर्रास दिसत आहेत. अनेक ठिकाणी ‘केवळ पार्सलची सुविधा’ असा फलक दिसतो; पण पार्सल नावाला, बाकी पूर्वीप्रमाणेच असे चित्र आहे. 

मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगने कोरानाविरुद्धची अवघड लढाई जिंकणे शक्‍य असले तरीही हे सोपे उपायही लोकांकडून पाळले जात नसल्याने कोरोना वाढत चालला आहे. एकीकडे ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटरविना अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. रुग्णाला बेड आणि इंजेक्‍शन मिळविताना नातेवाइकांना झडती देण्याची वेळ येत असताना नागरिकांना मात्र याचे गांभीर्य नसल्याने कोरोनाविरुद्धची लढाई अवघड होत आहे.
शहर आणि जिल्ह्यातही कोरोनाचा कहर वाढत चालला आहे.

 

हेही वाचा- माजी खासदार धनंजय महाडिकांसाठी आजही तो नंबर ठरतोय हिट

मास्क हनुवटीला, सोशल डिस्टन्स नावाला​

दिवसभरात सहाशेहून अधिक रुग्णांची भर पडत चालल्याने हा आकडा आता २७ हजारांवर गेला आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात लोकांना हॉस्पिटल उपलब्ध होत होते. आता मात्र कोरोनाग्रस्तांना हॉस्पिटल मिळविणे हे आव्हान झाले आहे. हॉस्पिटलमध्ये बेड सहज उपलब्ध होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. बेड वाढविले तरी प्रशासनावरही आता मर्यादा येत आहेत. खासगी हॉस्पिटलकडून सहजासहजी रुग्णांना बेड मिळत नाही. ऑक्‍सिजनही नाही आणि व्हेंटिलेटरही नाही, असे सांगण्यात येते.
 

कोरोनाग्रस्त रुग्ण त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांचे काय हाल होतात. हे माहीत असणारा कधीही नियम तोडणार नाही, परंतु याचे गांभीर्य ज्यांना नाही. ते शहरात कोरोना नसल्यासारखे फिरत आहेत. दंड टाळण्यासाठी मास्क गळ्यात अडकविला जातो. मास्क तोंडाला आणि नाकासमोर असणे बंधनकारक असते, पण हाच मास्क कित्येक नागरिकांच्या हनुवटीला असतो. सोशल डिस्टन्सिंगचा तर सर्वच ठिकाणी फज्जा उडालेला आहे. बाजार, मंडई येथे कोणाच्याही हातात ग्लोज नाहीत. मास्क कोणी घातला, कोणी नाही, असे चित्र आहे.

हेही वाचा-जागतिक माहितीचा वाटाड्या घेतोय कायमची रजा

बेडसाठी दिवसभर; इंजेक्‍शनसाठी रात्रभर 
कोरोनाग्रस्त रुग्णांना श्‍वास घ्यायला त्रास होतो. अंगात ताप असतो, चालताना दम लागतो, खोकला असतो. अशा अवस्थेतील रुग्णाला या दवाखान्यातून त्या दवाखान्यात नेण्याची वेळ येते. प्रत्येक दवाखान्याकडून बेड नाही, असेच उत्तर मिळते. दिवसभर फिरल्यानंतर बेड मिळतो. त्यानंतर डॉक्‍टर इंजेक्‍शनची चिठ्ठी लिहून देतात. हे इंजेक्‍शन मिळविण्यासाठी पुन्हा नातेवाइकांची धावपळ होते. रात्रभर एखाद्या औषध दुकानाच्या दारात ताटकळत उभा राहावे लागते. त्यानंतर कुठे इंजेक्‍शन मिळते. अशी रुग्ण आणि नातेवाइकांची अवस्था आहे.

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: battle against corona is difficult Emphasis on more patients covid 19 kolhapur