बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे मराठी कार्ड?

मल्लिकार्जुन मुगळी
Saturday, 14 November 2020

भारतीय जनता पक्षाने मराठी चेहऱ्याचा शोध सुरू केल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाने मराठी चेहऱ्याचा शोध सुरू केल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे पक्षातील इच्छूक मराठी भाषिकांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

पोटनिवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी पक्षातील काही इच्छूकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून पक्षनेतृत्वाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. खासदार व रेल्वेराज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी झाली. अंगडी यांच्या समर्थकांनी त्यासाठी मोहीमही चालविली. पण गेल्या काही दिवसांपासून ही मागणी बाजूला पडल्याचे चित्र दिसत आहे. भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार निवडीवेळी धक्कातंत्राचा वापर केला जावू शकतो अशी चर्चा गेले काही दिवस रंगली आहे. त्यात आता मराठा किंवा मराठी कार्ड वापरले जाणार असल्याची चर्चाही आहे. बेळगाव मतदारसंघातील मराठी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. त्याचा फायदा पुढील विधानसभा निवडणूकीत होईल असे पक्षनेतृत्वाला वाटते. 

सुरेश अंगडी यांनी सलग चारवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. 2004 साली ते भाजपचे जिल्हाध्यक्ष होते, त्याचवेळी पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. तत्कालीन खासदार अमरसिंग पाटील यांचा पराभव करून अंगडी लोकसभेवर निवडून गेले. अर्थात त्यावेळी त्यांच्या विजयात मराठी मतांचा वाटा सर्वाधिक होता. 2009 व 2014 सालीही त्यांना मराठीबहुल भागात सर्वाधित मते मिळाली. 2019 साली मराठीबहुल भागात त्यांचे मताधिक्‍य कमी होईल असा दावा विरोधकांकडून केला जात होता, पण आधीपेक्षा त्यांचे मताधिक्‍य वाढले. पुढील विधानसभा निवडणूकीसाठी बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघावर भाजपने आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

खासकरून जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी या मतदारसंघात आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून लोकसभेच्या पोटनिवडणूकीत मराठी उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. अर्थात भाजपने मराठी उमेदवार दिला तर कन्नडबहुल भागात मतदान होणार का? याची चाचपणीही सुरू आहे. पण बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप आमदारांची संख्या जास्त आहे, त्यामुळे मराठी उमेदवार निवडून येणे शक्‍य असल्याचे स्थानिक नेत्यांचे म्हणने आहे. 

हेही वाचा- ऋषीकेशच्या जीवनाची आता सुरुवात झाली होती म्हणत वडीलांच्या भावनांचा फुटला बांध -

बेळगाव लोकसभा मतदारसंघातील बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, बेळगाव उत्तर या तीन विधानसभा मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या जास्त आहे. यापैकी दक्षिण व उत्तर या दोन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. याशिवाय रामदूर्ग, सौदत्ती गोकाक व आरभावी या मतदारसंघातही भाजपचे आमदार आहेत. जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे गोकाकचे आमदार आहेत. बेळगाव ग्रामीण व बैलहोंगल या दोनच मतदारसंघात कॉंग्रेसचे आमदार आहेत. गेल्या सोळा वर्षांपासून या मतदारसंघात भाजपचे प्राबल्य आहे, त्या जोरावर मराठी उमेदवार निवडून येवू शकतो असे स्थानिक नेत्यांना वाटते. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum Lok Sabha election