
पहाटे तीनच्या सुमारास दोन गवे नवीन व जुना हायवे पार करून किसान पाणी पुरवठ्या नजीकच्या ऊस शेतीतून आले.
घुणकी (कोल्हापूर) : हातकणंगले तालुक्यातील किणी येथे वस्तीत पहाटे दोन गव्यांनी दर्शन दिल्याने किणी, घुणकी, वाठार,तळसंदे परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी येथे अजित नेमगोंडा पाटील यांची घरापाठी मागील बाजूस जुन्या हायवेलगत रिकामी जागा आहे. इथे चिंचेच झाड व शेजारी छोटा आड आहे. आज (शनिवारी) पहाटे तीनच्या सुमारास दोन गवे नवीन व जुना हायवे पार करून किसान पाणी पुरवठ्या नजीकच्या ऊस शेतीतून आले.
दरम्यान किणी येथील संजय चाळके हे पुण्याहून गावी परत आले असताना त्यांच्या मोटारी समोरुन दोन्ही गवे अजित पाटील यांच्या जागेत गेले. एखाद्या शेतकऱ्यांची जनावरे असावीत या भावनेतून चाळके यांनी शेजारच्या नागरिकांना माहिती दिली. पण ते गवे असल्याचे निदर्शनास आले. चिंचेच्या झाडाखाली काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर ज्या मार्गाने गवे आले त्याच मार्गाने ऊस तोडणी झालेल्या शेतातून तळसंदे गावच्या दिशेने गेल्याचे नागरीकांनी सांगितले.
वनविभागाच्या अधिका-यांना माहिती देण्यात आली. त्यांनी चौकशी सुरू केली आहे. नरंदे वनविभागाचे वनरक्षक ईश्वर जाधव, वनसेवक पी.एन.खाडे यांनी पाहणी केली.गव्यांचा भ्रमण काळ असल्याने ते एका ठिकाणी थांबत नाही. शेतकऱ्यांनी शेतात जाताना दोनहून अधिक शेतकऱ्यांनी काठी आणि रात्री बँटरी घेऊन जावे. गवे निघून जातात. त्यांना हुसकावून लावू नये.ते बिथरण्याची शक्यता असते. त्यामुळे सतर्क रहावे असे आवाहन वनविभागाने केले आहे.
हेही वाचा- जांबोटील छायाचित्रकाराच्या खूनाचा लागला छडा -
सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे. ऊस तोडणी मजूर वाहन रात्री आल्यानंतर ऊस वाहन भरण्यासाठी शेतात जातात. तसेच भारनियमनामुळे आठवड्यातील काही दिवस शेतातील विजपुरवठा रात्री सुरू असतो.पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात असतात.
पाडळी, मनपाडळे, पारगावात गव्यांचा मुक्काम
गतवर्षी पाडळी, मनपाडळे, पारगाव परीसरात गव्यांचा काही दिवस मुक्काम होता. हे गवे सादळे-मादळे परीसरतील जंगलातून आले होते.त्यानंतर वाहतुकीची प्रचंड वर्दळ असलेल्या किणी येथे अचानक गवे दिसल्याने भितीसह आश्चर्य व्यक्त होत आहे.
संपादन- अर्चना बनगे