esakal | हिरण्यकेशी नदीपात्रात काळे पाणी 
sakal

बोलून बातमी शोधा

Black Water In Hiranyakeshi River Basin Kolhapur Marathi News

हिरण्यकेशी नदी पात्रातील पाणी काळे झाले आहे. अंघोळी करण्यास जाणाऱ्यांच्या शरिराला पाण्यातील गाळ चिकटत आहे.

हिरण्यकेशी नदीपात्रात काळे पाणी 

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : हिरण्यकेशी नदी पात्रातील पाणी काळे झाले आहे. अंघोळी करण्यास जाणाऱ्यांच्या शरिराला पाण्यातील गाळ चिकटत आहे. नळालाही गढूळ पाणी येत आहे. नदीत मळी सोडल्याचा इन्कारही गडहिंग्लज कारखान्याने केल्याने हे काळे पाणी कशामुळे झाले, याचा शोध घेण्याची गरज ठळक होत आहे. 

नदीपात्रात नोव्हेंबरपासून पावसाचे पाणी साठवलेले होते. अपेक्षित असा उपसा नसल्याने फार दिवस पाणी शिल्लक राहिले. निलजीच्या पूर्वेला नदीपात्र कोरडे पडल्याने अखेर पश्‍चिमेकडील बंधाऱ्यातील पाणी पाटबंधारे विभागाने सोडले आहे. त्यातच आठ दिवसापूर्वी चित्री प्रकल्पातूनही आवर्तन सुरू केले आहे. सध्या पात्रातील पाणी वाहते आहे. तरीसुद्धा पाणी काळे दिसत आहे. अंघोळीला किंवा जनावर धुण्यासाठी येणाऱ्यांच्या शरिराला पाण्यातील गाळ चिकटत आहे. तसेच नळालाही पाणी गाळमिश्रीत येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

कारखान्यातून मळी सोडली असावी असा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत. परंतु, कारखाना प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी याचा स्पष्ट इन्कार केला. कारखान्याने मळीचे प्लॅंट उभारले आहेत. तसेच सध्या शेतकऱ्यांना शेतीसाठी टॅंकरद्वारे मळीचा पुरवठा केला जात आहे. यामुळे मळी नदीत सोडण्याचा प्रश्‍नच येत नाही.

काही दिवसापूर्वी याबाबत विचारणा झाल्याने कारखान्याने काही कर्मचाऱ्यांना कारखान्याच्या पश्‍चिमेकडील गजरगाव बंधाऱ्याजवळच्या पाण्याची पाहणी करण्यास पाठविले होते. तेथेही असेच पाणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्‍चिमेला कोणताही कारखाना नसतानाही तेथे काळे पाणी आहे. गडहिंग्लज पालिकेच्या सांडपाणी बंधाऱ्यातून झिरपणाऱ्या पाण्याचा हा परिणाम आहे का, याचीही पाहणी होणे आवश्‍यक असल्याचे पाटबंधारे विभाग सांगते.

एक तर नदीपात्रात शिल्लक पाण्याचा हा परिणाम असावा किंवा सांडपाणी बंधाऱ्यातून पाणी नदीत मिसळत असावे, अशी शंका पाटबंधारे विभाग वर्तवित असले तरी काळ्या पाण्यामागचे कारण अजून सापडलेले नाही. संबंधित विभागाने याचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे. मुळात हिरण्यकेशी नदी प्रदूषण विरहीत असताना अचानक आलेल्या या काळ्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur