रांगणा किल्यावर आढळी दुर्मिळ जातीची 'बॉम्बे लीफ टोड गेको'....

संदीप खांडेकर
रविवार, 2 ऑगस्ट 2020

 तिची नोंद गोवा, कर्नाटकासह महाराष्ट्रातील आंबोलीत झाली आहे... 

कोल्हापूर :  रंगाने पिवळी, अंगावर पांढरे टिपके  व दिसायला देखणी असणाऱी 'बॉम्बे लीफ टोड गेको' ही पाल कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले रांगणा व रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख परिसरात प्रथमच आढळली आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी (WLPRS) संस्थेच्या रिसर्च टीमच्या सर्वेक्षणात तिची या ठिकाणी नोंद झाली आहे. तिचे शास्त्रीय नाव हेमिडक्टलस प्रशादी (Hemidactylus prashadi) आहे.

प्रामुख्याने ही पाल फक्त भारतातील पश्चिम घाटात आढळते. आतापर्यंत तिची नोंद गोवा, कर्नाटकासह महाराष्ट्रातील आंबोलीत झाली होती. काही महिन्यांपासून वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी (WLPRS) संस्थेची रिसर्च टीम महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी काम करत असताना त्यांच्या सर्वेक्षणा दरम्यान किल्ले रांगणा, देवरुख परिसरामध्ये आढळून आली.

हेही वाचा- देशाची आर्थिक स्थिती चिंताजनक ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ -

याभागातून प्रथमच ती आढळून आल्याने तिच्या संवर्धनाची शास्त्रीय दृष्ट्या नोंद होणे गरजेचे असल्याने संस्थेचे  वन्यजीव संशोधक डॉ. अमित सय्यद यांनी तिच्यावरील रिसर्च पेपर 'रेपटाइल अँड अँफिबीयन्स' या अमेरिकेतील शोध पत्रिकेत सादर केले. त्यांना संस्थेचे देवेंद्र भोसले, अभिजित नाळे, आशुतोष सूर्यवंशी, किरण अहिरे, विजय गेंजगे, राहुल मंडलिक, राहुल ठोंबरे, अक्षय कांबळे यांचे सहकार्य मिळाले.
संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bombay Leaf Todd house gecko For the first time found in Fort Rangana and Devrukh area of ​​Ratnagiri district