
दरम्यान, सासू-सासऱ्यांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास माहेरच्या नातेवाइकांनी नकार दिला.
आष्टा (कोल्हापूर) : येथील दुधगाव रस्त्यावरील अनुजा अवधूत माळी (वय २३) या नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, ही आत्महत्या नसून, पती, सासू-सासऱ्यांनी घातपात केल्याच्या आरोप माहेरच्या नातेवाइकांनी केला आहे. याबाबत अनुजाचे वडील सुकुमार दत्तात्रेय पाटील (कांडगाव, गोठ्या माळ, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी अनुजाचे पती अवधूत संजय माळी, सासरे संजय बापू माळी, सासू वंदना संजय माळी यांच्याविरोधात आष्टा पोलिसांत फिर्याद दिली.
दरम्यान, सासू-सासऱ्यांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास माहेरच्या नातेवाइकांनी नकार दिल्याने रात्री उशिरा अनुजाचे पती, सासू-सासरे या तिघांना अटक करण्यात आली आहे. आष्टा पोलिसांत सुकुमार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुलगी अनुजा अवधूत माळी (वय २३) हिचा अवधूत माळी (दुधगाव रोड, आष्टा) याच्याशी २२ डिसेंबर २०२० रोजी विवाह झाला. विवाह झाल्यापासून ती सासरीच राहत होती. १३ जानेवारी रोजी ती संक्रांतीला माहेरी आली. त्यावेळी तिने पती व सासरचे लोक मारहाण करतात, मानपान केला नाही म्हणून टोचून बोलतात, असे सांगितले होते. ‘तुझ्या सासरच्यांना समजावून सांगतो’ असे आम्ही सांगितले.
हेही वाचा - शिंदे यांना शोधण्याचे काम गेल्या चार तासापासून युध्द पातळीवर सुरू आहे
१८ रोजी पती, सासू, सासरे, चुलत दीर, चुलत जाऊ कांडगावला तिला नेण्यात आले. त्यांना समजावून मानपान करून अनुजाला सासरी पाठवले. आम्ही, तसेच मेहुणे नारायण पांडुरंग चौगुले (अडूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) खुशाली विचारण्यास दूरध्वनी करत होतो. १९ रोजी रात्री नारायण चौगुले यांनी अनुजाला दूरध्वनी केला. पती रागवल्याचा, ओरडल्याचा आवाज आला. नवरा अवधूत मारहाण करीत असल्याबाबत मुलगी सांगत होती.
आज सकाळी सासरे संजय माळी यांनी दूरध्वनी करून कळवले, की अनुजाने गळफास लावून घेतला. तुम्ही या. आष्टा येथे गेलो असता तिचा मृतदेह खाली उतरून ठेवला होता. अनुजाने पती, सासरे, सासू वंदना यांच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केली आहे, असेही त्यांनी फिर्यादित म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटकही केली आहे.
ग्रामीण रुग्णालयाबाहेर गर्दी
अनुजाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला होता. कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या नातेवाइकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. सासू-सासऱ्यांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिसांनी पंचनामा केला. तहसीलदारांनी पंचनामा केला. सायंकाळी नातेवाइकांचा पवित्रा पाहून पोलिसांनी पती, सासू, सासऱ्यांना अटक केली आहे.
हेही वाचा - लग्नासाठी मुलगी पहाण्याला पुण्याला निघालेल्या कुंभार कुटूंबासोबत ही दुर्दैवी घटना घडली
संपादन - स्नेहल कदम