संघर्ष जगण्याचा अन्‌ वस्त्रोद्योगाला रूळावर आणण्याचा... 

संजय खूळ 
मंगळवार, 30 जून 2020

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वस्त्रोद्योग हळूहळू पूर्व पदावर येवू लागला आहे. 

इचलकरंजी :  यंत्रमागाची चाके सुरु झाली की शहरातील सर्व घटकांच्या जगण्याला गती येते. पण संकटातून मार्गक्रमण करीत असलेल्या या उद्योगाचे चाक कोरोनाच्या संकटामुळे अधिकच अडचणीच्या गर्तेत रुतले. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हळूहळू हा उद्योग पूर्व पदावर येवू लागला आहे. या उद्योगातील निगडीत प्रत्येक घटकाचा आता जगण्यासाठीचा संघर्ष सुरु झाला आहे. कोरोनाच्या संकटाशी दोन हात करीत आता प्रत्येकाची धडपड सुरु आहे ती वस्त्रोद्योगाला रुळावर आणण्यासाठी ! 

महाराष्ट्राची मॅंचेस्टरनगरी म्हणून लौकीक असलेल्या या शहराची संपूर्ण आर्थिक चक्रे ही यंत्रमाग व्यवसायातील चाकावरच अवलंबून असतात. यंत्रमागाचे एक चाक थांबले की चहाच्या टपरीपासून ते बॅंकेत रोज होणाऱ्या कोट्यवधीच्या उलाढालीवर परिणाम होतो. त्यावर थेट काम करणारे 80 हजार कामगार आणि अप्रत्यक्षरित्या अवलंबून असताना 60 ते 70 हजार कामगार यांचे जगणेच विस्कटून जाते. त्यामुळेच प्रत्येक संघर्षावर मात करीत शहरातील यंत्रमाग उद्योजक चाके गतिमान करण्यासाठी धडपडत असतो. शहरातील यंत्रमागाची चाके फिरू लागली कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर असलेला धोकाही संभाव्य होता. मात्र यावर मात करीत यावर काम करणारे हजारो कामगार जगण्यासाठी संघर्ष करीत यंत्रमाग मागाची चाके फिरवत असल्याचे चित्र या शहरात दिसत आहे. 

केवळ परिसरातीलच नव्हे तर कर्नाटकातील सीमा भागातून ते राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश येथील कामगार आता हळूहळू परतू लागले आहेत. तीन महिन्यात ठप्प असलेली चाके म्हणावी तशी अद्यापही गतीने फिरत नसली तरी जी चाके फिरत आहेत त्यातून हजारो कुटुंबाचा संसार पुन्हा हळूहळू फुलू लागला आहे. यंत्रमागधारकांनाही वेळेवर उत्पादन करून त्या त्या सिझनमध्ये लागणारे कापड पुरवठा करण्यासाठी धडपड करावी लागत आहे. यंत्रमाग कामगारांबरोबरच यंत्रमागधारकही एकूण गुंतवणूक, त्यावरील व्याज याच्याशी संघर्ष करीत चाके फिरविण्यासाठी अधिकच गती देत आहेत. शहरातील हा संघर्ष नक्कीच भविष्याच्यादृष्टीने आशादायक ठरत आहे. 

योग्य ती दक्षता घेऊन... 
कोरोनाची भिती यंत्रमाग व्यवसायावर आहे. काही दिवसात यंत्रमागावर काम करणारे कामगार यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र त्याची तमा न बाळगता हा संसर्ग अधिक पसरू नये, यासाठी योग्य ती दक्षता घेऊन व्यवसायाची चक्रे फिरविण्यासाठी कामगारांचेही प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनही अपघाताने झालेला संसर्ग हा कामगारांच्यादृष्टीने जगण्याच्या संघर्षात खूपच कमी महत्वाचा ठरत आहे. 

दृष्टीक्षेपात यंत्रमाग उद्योग 
- सद्यस्थितीत शहरातील 30 ते 40 हजार यंत्रमाग पुन्हा नव्याने सुरू 
- 25 हजारहून अधिक कुटुंबाना थेट काम 
- गेले 3 महिने आर्थिक संकटातील कुटुंबाना उद्योगाचा मिळतोय आधार 
- परराज्यातील कामगारही मॅंचेस्टर नगरीत परतू लागलेत. 
(पूर्वार्ध) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bring the textile industry back on track