चुलत भावाच्या खून प्रकरणी सख्ख्या भावांना जन्मठेप

लुमाकांत नलवडे
Friday, 16 October 2020

जागेच्या कारणावरून 28 फेब्रुवारी 2018 ला सकाळी नऊ वाजता बेले (ता.करवीर) येथे ही घटना घडली होती.

कोल्हापूर : बेले (ता. करवीर) येथे चुलत भावाच्या खून प्रकरणी विजय दिनकर कांरडे (वय 42) आणि राजेंद्र दिनकर कारंडे (वय 39)  या सख्ख्या भावांना जन्मठेप आणि प्रत्येकी वीस हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास एक वर्षाची साधी कैद अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र.3) एम.के.जाधव यांनी ही शिक्षा सुनावली. चुलत भाऊ धनाजी कारंडे यांच्या खून प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली. तर आरोपींचे वडील दिनकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 

जागेच्या कारणावरून 28 फेब्रुवारी 2018 ला सकाळी नऊ वाजता बेले (ता.करवीर) येथे ही घटना घडली होती. इस्पुर्ली पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा नोंद झाला होता. सरकारी वकील अमिता ए. कुलकर्णी यांनी फिर्यादीच्यावतीने काम पाहिले. 

मयत धनाजी कारंडे हा राजेंद्र कारंडे याच्या घराशेजारी घर बांधत होता. त्यासाठी चिरा ठेवण्यासाठी यातील फिर्यादी नामदेव कारंडे व मयत धनाजी हे साफसफाई करीत असताना विजय कारंडे हा तेथे येवून "तुम्ही येथे काय करता, ही जागा आमची आहे. असे म्हणून यातील नामदेव व धनाजी यांना शिवीगाळ करत तुम्हाला आज जिवंत ठेवणार नाही, असे म्हणून हातातील बांबू घेवून मयत धनाजीच्या डोकीत मारला. त्यामुळे तो गंभीर जखमी होवून खाली पडला. त्याला उठविण्यासाठी नामदेव कारंडे गेले असता राजेंद्र कारंडे याने त्याचे हातातील काठी नामदेव यांच्या डोकीत मारली. नामदेव हे आरडा- ओरड करीत असताना त्यांची आई जखमी सखुबाई कारंडे सोडवण्यासाठी गेल्या असता यातील आरोपी राजेंद्र याने त्याचे हातातील काठी डोकीत मारून जखमी केले. तसेच आरोपी विजय कारंडे, राजेंद्र कारंडे, दिनकर कारंडे यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. मयत धनाजी कारंडे याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्यादी नामदेव कारंडे यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील पोलिस चौकीत दिली. उपचार घेत असताना फिर्याद दिल्याने खुनाचा प्रयत्न आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल झाला. त्यानंतर खासगी रुग्णालयात 8 मार्च 2018 ला धनाजीचा मृत्यू झाला. त्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल होऊन तपास इस्पुली पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. जी. पोवार यांनी केला व दोषारोपपत्र पाठवले. 

खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. जाधव यांच्यासमोर झाली. सुनावणीत सरकारी पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यामध्ये प्रत्यक्ष खुन होताना पाहणारे प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार डॉक्‍टर आणि तपासी अधिकारी यांची साक्ष नोंदविण्यात आली. दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने विजय कारंडे आणि राजेंद्र कारंडे या सख्ख्या भावांना जन्मठेप आणि प्रत्येकी वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवण्यात आली. दंड न दिल्यास एक वर्षाची साधी कैद अशी शिक्षा ठोठवण्यात आली. 
सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अमिता ए.कुलकर्णी यांनी काम पाहिले. या खटल्याच्या कामी महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल नाझनीन देसाई व ऍड. भारत ए. शिंदे यांचे सहकार्य लाभले. 

हे पण वाचाकोणाच्या सांगण्यावरून सारथी बंद करण्याचा घाट घातला गेला ? बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा’, संभाजीराजे पुन्हा आक्रमक 

व्हीसीद्वारे सुनावली शिक्षा 

कोविड-19मुळे व्हीसीद्वारे सुनावणी झाली. यामध्ये विजय दिनकर कारंडे (वय 42) हा सध्या कारागृहात होता. त्याला व्हीसीद्वारे न्यायाधिशांनीही ही शिक्षा सुनावली, तर राजेंद्र दिनकर कारंडे (वय 39) याला जामीन मंजूर झाला होता. वडील दिनकर यांना गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केल्याची माहिती सरकारी वकील अमिता ए. कुलकर्णी यांनी दिली.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: brothers sentenced to life in cousins murder case