मंत्री वडेट्टीवार यांना काळे फासणाऱ्या व्यक्तीला मराठा भूषण पुरस्कार ; सचिन तोडकर

लुमाकांत नलवडे
Tuesday, 26 January 2021

कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे तसेच जाहीर केलेली भरती सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होईपर्यंत थांबवावी, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे.

कोल्हापूर : बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रातिनिधिक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न आज कोल्हापुरातील दसरा चौकात झाला. हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला असला तरी सकल मराठा समाजातील महिलांनी त्यांच्या पुतळ्याला बांगड्याचा आहेर केला. मंत्री वडेट्टीवार यांनी मराठा समाजाच्या आरक्षणा विरोधात घेत असलेली भूमिका थांबवावी, अशीही मागणी सकल मराठा समाजाच्या आंदोलनाचे राज्य समन्वयक दिलीप पाटील आणि सचिन तोडकर यांनी केली. तसेच मंत्री वडेट्टीवार यांना काळे फासणाऱ्या व्यक्तीला मराठा भूषण पुरस्कार देऊन गौरव करू, असेही आवाहन यावेळी राज्य समन्वयक सचिन तोडकर यांनी केले.

कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे तसेच जाहीर केलेली भरती सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होईपर्यंत थांबवावी, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे. आज प्रजासत्ताक दिनी अचानक आंदोलकांनी मंत्री वडेट्टीवार यांच्या विरोधी घोषणाबाजी करून त्यांचा प्रातिनिधिक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना आवर घालुन पुतळा दहन करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी महिलांनी बांगड्या चा आहेर पुतळ्याला दिला.

आंदोलनाबाबत राज्य समन्वयक सचिन तोडकर म्हणाले, "मंत्री वडेट्टीवार यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली आहे.  त्यामुळे आम्ही आज अचानकच त्यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत नोकर भरती थांबवावी, अशीही आमची मागणी आहे. गेली सहा दिवस ठिय्या आंदोलन सुरू असताना कुणीही दखल घेत नाही म्हणून आम्ही आता शांततेचे आंदोलन न करण्याचा पवित्रा घेतला आहे.""आंदोलनात स्वप्निल पार्टे, शैलेश जाधव, भास्कर पाटील, संजय जमदाडे,धनश्री तोडकर, दया वायचळ, मेघा क्षीरसागर, आदींनी सहभाग घेतला.

दरम्यान सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनीही भेट दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची भूमिका असून आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी  सांगितल्याचे तोडकर यांनी सांगितले आमदार पाटील यांच्या बरोबर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव महानगर जिल्हाध्यक्ष (शहर ) राहुल चिकोडे उपस्थित होते.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burning of a representative statue of Minister Vijay Wadettiwar kolhapur latest news