esakal | सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट दाखवा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  
sakal

बोलून बातमी शोधा

c m uddhav thackeray karnataka maharashtra border issue

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, नववर्षाची सुरुवात चांगल्या उपक्रमाने झाली आहे

सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट दाखवा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट काय आहे, हे दाखवून देऊया. कर्नाटक सरकार ज्या पद्धतीने न्यायालयाचा अवमान करून सीमाभागात एक-एक पाऊल टाकत आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासन यापुढे आपली पावले टाकत आहे. त्यासाठी सर्वपक्षीयांची, सर्व नेत्यांची एकजूट केली पाहिजे. सीमावासियांचा आक्रोश राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोहचविण्यासाठी प्रयत्न करू, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. 

शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत देण्यात येणारी अधिस्वीकृती पत्रिका पहिल्यांदाच सीमा भागातील मराठी वृत्तपत्रांच्या दोन महिलाइद संपादकांना मंजूर करण्यात आली आहे. या पत्रिकांचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते बेळगाव जिल्ह्यातील संपादक श्रीमती क्रांती सुहास हुद्दार व संपादक श्रीमती बबिता राजेंद्र पोवार यांना वितरण करण्यात आले. मुंबई येथील वर्षा निवासस्थान येथील समिती सभागृहात झालेल्या याचे वितरण झाले. 

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, नववर्षाची सुरुवात चांगल्या उपक्रमाने झाली आहे. पत्रकार दिनी सीमा भागातील मराठी वृत्तपत्राच्या दोन महिला संपादकांना राज्य शासनाची अधिस्वीकृती पत्रिका देवून सीमा लढ्याला बळ देण्याचा प्रयत्न आहे. सीमाभागातील माता भगिनींना न्याय मिळवून देण्याची आमची जिद्द आहे. या प्रश्नात एकजूट करण्यासाठी सर्वपक्षीय, सर्व नेत्यांनी आप-आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीतही आता एकी दिसत नाही. या सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्या पद्धतीने कर्नाटक सरकार पावले टाकत आहे. त्याचपद्धतीने महाराष्ट्र सरकारही पावले टाकेल. यातून महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची एकजूट काय आहे, हे दाखले पाहिजे. 
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, सीमा भागातील मराठी भाषिक वृत्तपत्र संपादकांना राज्य शासनाची अधिस्वीकृती पत्रिका देवून या लढ्यात राज्य शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. सीमा लढ्यात वृत्तपत्रांचे योगदान मोलाचे असून त्यांनी हा लढा जीवंत ठेवला आहे. भाषा जीवंत राहिली तर लढा जीवंत राहील यासाठी सीमा भागात मराठी शाळा सुरु होणे गरजेचे आहे. 

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई म्हणाले, मराठी भाषा विभागामार्फत सीमा भागातील मराठी शाळांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सीमा भागात मराठी भाषा विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 
माहिती राज्यमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, सीमा भागातील मराठी वृत्तपत्र संपादकांना अधिस्वीकृती पत्रिका देवून महासंचालनालयाने ऐतिहासिक काम केले आहे. सीमा लढ्यात पत्रकारांचा वाटा मोलाचा आहे. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील पत्रकारांच्यावतीने जेष्ठ पत्रकार मनोहर कालकुंद्रीकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे, अजय अंबेकर, संचालक गोविंद उपस्थित होते. 

हे पण वाचा - मित्राला आला सांगलीतून एक फोन अन्  


सीमा लढ्याचा मला वारसा 
सीमा लढा माझ्या अंतरकरणाच्या जवळचा विषय आहे. आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून ते बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून सीमा लढ्याचा वसा आणि वारसा मला मिळाला आहे. या लढ्याशी आपले नाते आणि ऋणानुबंध दोन पिढ्याचे आहे, असा उल्लेखही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. 


संपादन - धनाजी सुर्वे