उमेदवार प्रचारासाठी आजमावणार पथनाट्याचा फंडा 

ऋषीकेश राऊत 
Sunday, 3 January 2021

निवडून येण्यासाठी उमेदवार वाटेल ते करण्यास इच्छुक तयार असतो. त्यासाठी प्रचार हे प्रभावी साधन सोबत असते.

इचलकरंजी (कोल्हापूर)  : विधानसभा, लोकसभा, पालिका निवडणुकीत प्रचारासाठी चाललेला पथनाट्याचा फंडा आता ग्रामपंचायत निवडणुकीतही दिसणार आहे. मतदारांना भुरळ घालण्यासाठी सोशल मीडियासह थेट पथनाट्य, वासुदेवावर उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. अभिनयाच्या माध्यमातून मतदारांच्या मनात जागा करण्यासाठी उमेदवारांचा प्रयत्न असेल. शहरासह ग्रामीण भागात आता कलाकारांची जुळवाजुळव करण्यास यंत्रणा व्यस्त आहे.

निवडून येण्यासाठी उमेदवार वाटेल ते करण्यास इच्छुक तयार असतो. त्यासाठी प्रचार हे प्रभावी साधन सोबत असते. प्रचाराचे स्वरूप बदलत असताना अनेक नवे फंडे निवडणुकीत आजमावले जातात. शासकीय योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी पथनाट्याचा वापर प्रशासनाकडून होत असतोच. याच धर्तीवर या पथनाट्याचा वापर प्रत्येक निवडणुकीत उमेदवार प्रचारासाठी करीत आला आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पथनाट्यासारखा फंडा प्रचारासाठी वापरण्याची शक्कल लढविली जाणार आहे.

७०० ते ९०० मतदान असलेल्या प्रभागात मतदारांना आकर्षित करण्यास फारशी धडपड उमेदवारांना करावी लागत नाही. मात्र, प्रचार यंत्रणेतील बदल, मतदारांची आवड आणि प्रत्यक्ष मतदारांना आपलेसे करीत त्यांच्या मनात छाप टाकणारी शक्कल अनेकदा पथनाट्यातून यशस्वी झाली आहे. यामुळे मतदारांमध्ये मिसळून प्रचाराचा जोर प्रभागात वाढविण्यासाठी यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत पथनाट्य, वासुदेव दिसणार आहेत. भेटीगाठीबरोबर मनोरंजनाच्या माध्यमातून हे प्रचाराचे तंत्र अवलंबण्यासाठी अनेक जण उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच कामाला लागले आहेत. शहरासह ग्रामीण भागात पथनाट्य करणाऱ्या कलाकारांचा शोध घेऊन जुळवाजुळव सुरू आहे.

फ्लॅश मॉबचाही वापर
दहा ते बारा जणांचा ग्रुप अचानकपणे एका ठिकाणी एकत्र येतो. संगीताच्या तालावर ते थिरकू लागतात. त्यांच्याभोवती नागरिकांची गर्दी जमते आणि नृत्य करीत असतानाच हळूहळू ते उमेदवाराची माहितीही सांगू लागतात. हा सर्व प्रकार म्हणजे अलीकडे प्रचारासाठी लोकप्रिय ठरलेला फ्लॅश मॉब आहे. नावीन्यपूर्ण असणाऱ्या या फ्लॅश मॉबचा ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात वापर होऊ शकतो.

कलाकार लागले कामाला
कोरोनामुळे कलाकारांचे उत्पन्नाचे मार्ग थांबले. युवा महोत्सव न झाल्याने महाविद्यालयीन कलाकारांचा हिरमोड झाला. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकांमुळे या कलाकारांकडे संधी चालून आली आहे. अनेक जण आपला ग्रुप तयार करून पथनाट्य, वासुदेव आदींच्या माध्यमातून प्रचारासाठी विचारणा करीत आहेत. रोजगाराच्या निमित्ताने ग्रामपंचायत निवडणूक कलाकारांसाठी सुवर्णसंधी ठरेल.

कोरोनामुळे थांबलेली कला ग्रामपंचायत निवडणुकांमुळे जिवंत झाली आहे. यंदा पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकांममध्ये पथनाट्याला मागणी असल्याने आम्ही कलाकार मंडळी कामाला लागलो आहोत. अनेक महिन्यांनंतर कलेला व्यासपीठ आणि रोजगारही मिळणार आहे.
- अनिल वडर, पथनाट्य कलाकार

संपादन-अर्चना बनगे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Candidates try street drama campaigning kolhapur