निर्देश नसल्याने "या' प्राध्यापकांच्या नियुक्‍त्या अधांतरी; मानधनच नसल्याने आर्थिक प्रश्‍न बिकट

अवधूत पाटील
Wednesday, 12 August 2020

वरिष्ठ महाविद्यालयांतून पदवी व पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. कमी कष्टात शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्याने उच्चशिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गेल्या दशक-दोन दशकांत महाविद्यालयांची संख्याही वाढली.

गडहिंग्लज : कोरोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला आहे. शिक्षण क्षेत्रही यातून सुटलेले नाही. विशेषत: तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांची मोठी अडचण झाली आहे. दरवर्षी महाविद्यालयांचे कामकाज सुरू होऊन "सीएचबी'वरील प्राध्यापकांना नियुक्तीही मिळत होती. त्यामुळे थोडा विलंब असेना का; पण मानधनाची शाश्‍वती मिळत होती. मात्र, यंदा ऑगस्ट मध्यावर आला, तरी अद्याप नियुक्तीचा पत्ता नाही. त्यामुळे मानधन तर खूप दूरची गोष्ट आहे. परिणामी, "सीएचबी'वरील प्राध्यापकांसमोर आर्थिक प्रश्‍न बिकट झाला.

वरिष्ठ महाविद्यालयांतून पदवी व पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. कमी कष्टात शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्याने उच्चशिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गेल्या दशक-दोन दशकांत महाविद्यालयांची संख्याही वाढली. नियमित प्राध्यापक निवृत्त होत गेले. पण, त्यांच्या ठिकाणी नव्याने नियुक्ती करताना शासनाने डोळेझाक केली आहे. त्यामुळे तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती हाच एक पर्याय राहतो. यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान जरूर टळले आहे. पण, त्यांची बौद्धिक भूक भागविण्याऱ्या "सीएचबी'वरील प्राध्यापकांना तुटपुंजे मानधन देऊन अर्धपोटी ठेवले जाते. अन्य काही पर्याय नसल्याने त्यांना अपुऱ्या मानधनावरच समाधान मानावे लागत आहे. 

यापूर्वी "सीएचबी'वरील प्राध्यापकांची महाविद्यालयांकडूनच नियुक्ती केली जात होती. गेल्या वर्षी त्यात बदल करण्यात आला. महाविद्यालयाने विद्यापीठाला प्रस्ताव पाठविल्यावर विद्यापीठ सहसंचालक कार्यालयाकडून मंजुरी घेत आहे. पण, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावाने "सीएचबी'वरील प्राध्यापकांची परिस्थिती आणखी बिकट केली. कोरोनाची परिस्थिती पाहता गेल्या वर्षीच्या प्राध्यापकांनाच यंदा कायम करावे, अशी मागणी होत आहे. पण, अद्याप नियुक्‍त्याच मिळालेल्या नाहीत. नियुक्तीच नाही तर मानधन कसे मिळणार? फेब्रुवारीत शेवटचे मानधन मिळाले आहे. पाच महिन्यांपासून मानधन नसल्याने आर्थिक परिस्थिती बिकट बनली. अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

पूर्णवेळ लोकांना अर्धवेळ काम, मग... 
कोरोनामुळे महाविद्यालयांचे कामकाज बंदच आहे. मात्र, ऑनलाईन शिक्षण दिले जाते. महाविद्यालये कधी सुरू होतील, हे सध्या तरी सांगता येत नाही. अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षणामुळे पूर्णवेळ प्राध्यापक सध्या अर्धवेळ काम करीत आहेत. मग तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे काय, असा प्रश्‍न उपस्थित होतो. 

निर्देश आलेले नाहीत
गेल्या वर्षीच्या "सीएचबी'वरील प्राध्यापकांनाच यंदा कायम करावे, अशी मागणी केली जात आहे. पण, शासनाकडून अद्याप तसे कोणतेही निर्देश आलेले नाहीत. याबाबत विद्यापीठानेही पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे. 
- डॉ. अशोक उबाळे, प्रभारी शिक्षण सहसंचालक, कोल्हापूर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CHB Professor Appointments Not Yet Kolhapur Marathi News