क्रिकेटचं बदलतं स्वरूप: ‘कोंबडी’ उडाली भुर्रऽऽऽऽ ‘चिअर गर्ल्स’ आल्या...!

Cheer girls Code of Conduct for Gram Panchayats only
Cheer girls Code of Conduct for Gram Panchayats only

कोल्हापूर: दसरा झाला की गावच्या माळावरच्या मैदानाला गावगन्ना क्रिकेटचे वेध लागायचे. अख्ख्या पंचक्रोशीत स्पर्धेची माहिती पत्रकं झळकायची. स्पर्धा सुरू झाली की दिवसभर पोरांचा गोतावळा भूक-तहान विसरून क्रिकेटचा आनंद घ्यायचा. एक स्पर्धा संपताच दुसऱ्या स्पर्धेची घोषणा व्हायची. खेळाडूंना चिअर अप्‌ करण्याची ईर्ष्याही समर्थकांत ठासून भरलेली.

‘पेरूवालाऽऽऽ चिकूचिकूऽऽऽ’, ‘घेता का विस्कटू’ अशा अस्सल कोल्हापुरी पद्धतीने विशिष्ट लयीत चिअर अप करणारी पोरं तर प्रत्येक टीमकडे हमखास असायचीच. षटकार किंवा चौकारांची हट्ट्रिक करणाऱ्यांना ऐन सामन्यावेळी बक्षिसे जाहीर व्हायची. दोन कोंबड्या, चार डझन अंडी असं बक्षिसांचे स्वरूप. विजेत्या संघासाठी तर अख्खं बकरंच बक्षीस म्हणून जाहीर व्हायचं. पण, गेल्या दहा वर्षांत या स्पर्धांचं स्वरूपच पालटलं. ‘आयपीएल’च्या धर्तीवर त्या होऊ लागल्या. कोंबडी भुर्रऽऽऽ उडाली आणि ‘चिअर गर्ल्स’च्या निमित्तानं धांगडधिंगा सुरू झाला. काल म्हासुर्लीपेकी गवशी पाटीलवाडी (ता. राधानगरी) येथील असाच प्रकार उघडकीस आला आणि स्पर्धांच्या या बदलत्या स्वरूपावर आता चर्चा सुरू झाली. 


कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर प्रत्येक गावात क्रिकेटचं वेड आहे आणि गावगन्ना क्रिकेट स्पर्धा हा या गावांतील खेळाडूंचा खरा आनंदोत्सव असतो. आपल्या टीमची मॅच असली की शेतीकामाबरोबरच सेंट्रिंग आणि इतर व्यवसाय करणाऱ्या पोरांचा खाडा ठरलेला. काहींचं क्रिकेटप्रेम तर इतकं भारी की अख्खा हंगाम ही पोरं मैदानावरून कधी हलतच नाहीत. मोठ्या लोकसंख्येच्या गावात विशिष्ट स्पर्धा हमखास असतात. त्याचबरोबरीने ‘आयपीएल’ धर्तीवर स्पर्धा सुरू झाल्या आणि ईर्षेबरोबरच अर्थकारणही वाढले. त्यातूनच ‘आयपीएल’ची कॉपी करण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. 

प्रकाशझोतातील सामने...
पूर्वी विजेत्या संघांना पाच आणि दहा हजारांची बक्षिसांची रक्कम असायची; पण ती आता लाख, सव्वा लाख अशी लाखाच्या घरात गेली आहे. एकेका स्पर्धेची एकूण उलाढाल तर पाच ते दहा लाखांच्या घरात जाऊ लागली आहे. काही गावात नाईट स्पर्धांचे आयोजन होते आणि प्रकाशझोतामध्ये सामने खेळवले जातात. अर्थात अशा स्पर्धांसाठी मोठी स्पॉन्सरशिपही मिळवली जाते.

कडक आचारसंहिता हवी
‘चिअर गर्ल्स’चा विचार केला तर संयोजकांतर्फेच नव्हे तर अंतिम स्पर्धेतील संघही वैयक्तिक पातळीवर अशा ‘चिअर गर्ल्स’ना निमंत्रित करतात. सर्वत्रच असे प्रकार घडतात असेही नाही. मात्र ग्रामपंचायतींनाच आचारसंहिता करावी लागणार आहे. यापूर्वी डान्स बारलाही बंदीसाठी कोल्हापूरने पुढाकार घेत ते बंद पाडल्याचा इतिहास आहे.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com