सावधान ; पन्हाळा परिसरात बिबट्या, गव्यांचे वास्तव्य 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

पन्हाळा परिसरात गव्यांचा कळप तर आहेच पण बिबट्याचे अस्तित्व जाणवू लागले आहे. आज सकाळी तीन दरवाजाच्या खालील बाजूस असलेल्या सोमवारपेठ ते इंजोळे या दरम्यान 20 ते 22 गव्यांचा कळप इंजोळे येथील भरत रंगराव पाटील यांना एसटीतून प्रवास करत असताना दिसला.

पन्हाळा : पन्हाळा परिसरात गव्यांचा कळप तर आहेच पण बिबट्याचे अस्तित्व जाणवू लागले आहे. आज सकाळी तीन दरवाजाच्या खालील बाजूस असलेल्या सोमवारपेठ ते इंजोळे या दरम्यान 20 ते 22 गव्यांचा कळप इंजोळे येथील भरत रंगराव पाटील यांना एसटीतून प्रवास करत असताना दिसला. त्यांनी त्या कळपाचे व्हिडिओ शुटिंग केले, तर बुधवारी सकाळी7 वाजताता चार दरवाजाच्या खालील बाजूस असलेल्या मंगळवारपेठ परिसरातून आलेला बिबट्या वीर शिवा काशिद स्मारक परिसरातून वनखात्याच्या मार्तंड जंगल परिसराकडे निघाला होता. परंतु, रस्त्यावरील वाहनांच्या आवाजामुळे तो तसाच दबकत दबकत पन्हाळा रस्त्यावर असलेल्या वीजेच्या दोन डांबाकडे सरकला आणि तेथून उडी मारून तो सरळ डांबरी रस्त्यावर आला आणि रस्त्यावरील सागवानाच्या झाडीत घुसुन मार्तंड परिसराकडे गेला. पन्हाळ्याकडे येणाऱ्या एका दुचाकीस्वाराच्या समोरूनच बिबटया गेल्याने तो गर्भगळीत झाला. सकाळच्या प्रहरी नाका परिसरातील लोक फिरायला या रस्त्यावरून जात असल्याने त्याने हा प्रकार लोकांना सांगितला. सर्वजण बिबट्या कोठे दिसतो का याचे निरिक्षण करत असतानाच गुरुवारपेठेतील हॉटेल रिट्रीट चे मालक सचिन देसाई नेहमीप्रमाणे आपल्या कुत्र्याला घेवून फिरायला नाका परिसराकडे येत होते. त्यांनीही शिवा काशिद स्मारक परिसरात रस्त्याकडेला लावलेल्या चिव्याच्या बेटात खसपस चालू होती आणि आपला कुत्राही तेथे थबकल्याचे सांगितले. 

अवघ्या पाचच मिनिटात हा बिबट्या गुरुवारपेठेपासून मार्तंड परिसरात जाणाऱ्या कच्या रस्त्यावर आला आणि झाडांवर असलेली वानरे मोठमोठयाने चित्कारून एकमेकांना सावध करू लागली. दुचाकीस्वाराच्या सांगण्यानुसार हा बिबटया अडीच ते तीन फूट उंचीचा होता. पन्हाळा परिसरात दगडकपारी मोठया प्रमाणात असल्याने बिबट्यास राहण्यास सोईस्कर जागा आहे. तसेच परिसरात झाडाझुडपांचे प्रमाण वाढल्याने त्यात त्याला ससे, मोर, माकडे आदि प्रकारचे खाद्यही भरपूर प्रमाणात मिळत असल्याने त्याचे वास्तव्य कधी मार्तंड, पावनगड परिसरात तर कधी तबक उद्यानाखालील जंगलात असते. जंगलातील खाद्य कमी झाले की मग तो तटबंदीखालील गावातील भटकी कुत्री पळवतो आणि मग लोकाची ओरड सुरऐ होते. 

या बिबटयांचा त्रास नागरिकांना कधीच होत नाही. तो मुद्दामहून त्यांच्या वाटेला जातही नाही. उलट काही ठराविक लोक जंगलातील गवत कापून झाले की आगी लावण्याचे प्रकार करून त्याच्या परिसरावर अतिक्रमण करतात, त्याचे खाद्य कमी करतात. 

गव्यांच्या कळपाला शेतकरी वैतागले 
पन्हाळा परिसरातील जंगल बिबटे, रानडुकरे, ससे, भेकर, तसेच अलिकडे आलेल्या गव्यांच्या कळपामुळे समृद्ध बनले आहे. त्यामुळे चोरतोडीस आळा बसला आहे. बिबट्याचे वास्तव्य ही पन्हाळगडाची शान आहे. तथापि गव्यांच्या कळपामुळे मात्र परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, शेतकऱ्यांनी लांबून दऱ्या खोऱ्यातून पाणी आणून कसातरी जगवलेला उस, गहू, मका यांचा फडशा गवे पाडत असल्याने शेतकरी वर्ग या कळपाला वैतागला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cheers fund on panhala fort