आयजीएम रुग्णालयाची स्वच्छता केवळ सहा कर्मचाऱ्यांवर

ऋषीकेश राऊत
Friday, 22 January 2021

कित्येक दिवसाचा कचरा एकाच ठिकाणी पडलेला, प्रचंड दुर्गंधी, अस्वच्छता यामुळे आयजीएम रुग्णालय विद्रुप संकटात सापडले आहे.

इचलकरंजी : कित्येक दिवसाचा कचरा एकाच ठिकाणी पडलेला, प्रचंड दुर्गंधी, अस्वच्छता यामुळे आयजीएम रुग्णालय विद्रुप संकटात सापडले आहे. सध्या केवळ 6 सफाई कर्मचाऱ्यांवर आयजीएमची जबाबदारी असल्याने अस्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. परिचारिकांना स्वच्छतेसाठी सफाई कर्मचाऱ्यांसाठी रस्सीखेच करावी लागत आहे. 

कोरोनामध्ये प्रशासनाने गरज लक्षात घेऊन 67 कर्मचारी कंत्राटी पध्दतीने आयजीएम रुग्णालयात कामावर रुजू करून घेतले. यामध्ये सर्वाधिक सफाई कर्मचारी होते. त्यामुळे स्वच्छतेचा अभाव जाणवला नाही. यामुळेच आयजीएम रुग्णालयाने कोरोनाचा लढा यशस्वीपणे लढला, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आला आणि आयजीएमची अवस्था प्रशासन जैसे थे करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या रुग्णालयातील कंत्राटी पद्धतीचा ठेका रद्द करून सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. त्यामुळे आयजीएमची स्थिती पुन्हा गंभीर बनत आहे. केवळ सहा सफाई कर्मचाऱ्यांवर स्वच्छतेची जबाबदारी आली असून स्वच्छता करताना त्यांना नाकीनऊ येत आहे. 

रुग्णालयात प्रवेश करताच विविध ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. प्रत्येक व्हरांड्याचा कोपरा कचरा डेपो बनला आहे. गेल्या आठवड्याभराचा कचरा काही ठिकाणी तसाच पडलेला असून वॉर्डातील कचराकुंड्या जैविक कचऱ्याने ओव्हरफ्लो झाल्या आहेत. प्रत्येक परिचारिकांना वॉर्डातील स्वच्छतेसाठी सफाई कर्मचाऱ्यांना पायघड्या घालाव्या लागत आहेत. यातून वादाचे प्रसंगही घडत आहेत. ही अस्वच्छता उपचार घेऊन बरे होण्यासाठी आलेल्या रुग्णांना अधिक त्रासदायक बनली आहे. वेळीच शासनाने याकडे लक्ष देऊन सफाई कर्मचाऱ्यांची भरती करणे गरजेचे आहे, तरच आयजीएमचे अस्तित्व टिकून राहील आणि नागरिक उपचारासाठी येतील. 

आयसीयुमध्ये अस्वच्छता 
आयसीयू युनिटमध्ये सर्वप्रथम स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते, मात्र आयजीएमच्या आयसीयुमध्येच अस्वच्छता आहे. सिरिंज उघड्यावर तशाच पडलेल्या आहेत. मोकळ्या बेडवरील रुग्णांनी वापरलेले अंथरूण जैसे थे आहे. दुर्गंधी पसरल्याने याचा त्रास रुग्णांना होत आहे. 

अस्वच्छतेचा प्रश्‍न
काही वर्षांपासून सफाई कर्मचाऱ्यांची भरती करावी, अशी मागणी कायम शासनाकडे केली आहे. आता कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. सध्या सहाच सफाई कर्मचारी स्वच्छतेच्या कामात असून अस्वच्छतेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
- डॉ. आर. आर. शेटे, वैद्यकीय अधीक्षक, आयजीएम 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Cleaning Of IGM Hospital Is On Only Six Staff Members Kolhapur Marathi News