बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेतील इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी 

सुनील पाटील 
Friday, 20 November 2020

 चित्रपट व नाटक वगळता बंदिस्त सभागृह व इतर कार्यक्रमासाठी सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्ट करुनच प्रवेश दिला पाहिजे

कोल्हापूर : बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेत होणाऱ्या इतर सांस्कृतिक कार्यक्रम नियम व अटींच्या अधीन राहून सुरु करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या. सभागृहातमध्ये प्रवेश करताना थर्मल स्कॅनिंग, ताप तपासला जावा. तसेच, सभागृहात 50 पेक्षा जास्त लोकांची बसण्याची व्यवस्था असू नये, अशाही सूचना दिल्या आहेत. कोरोनामुळे बंद असलेले बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेतील सांस्कृतिक कार्यक्रम बंद होते. आता ते हे कार्यक्रम सुरु केले जात आहे. मात्र, यासाठी नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. ज्या सभागृहाकडून नियम व अटींचे पालन केले जाणार नाही, अशांवर कारवाई केली जाईल, असाही इशारा श्री देसाई यांनी दिला आहे. 

 चित्रपट व नाटक वगळता बंदिस्त सभागृह व इतर कार्यक्रमासाठी सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्ट करुनच प्रवेश दिला पाहिजे. बंदिस्त सभागृहात 50 टक्के प्रेक्षक मर्यादा असवी. प्रेक्षकांमध्ये किमान 6 फुटांचे अंतर हवे. कलाकारांनी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करावी. सभागृहातील सर्व परिसर, खोल्या, प्रसाधनगृहे स्वच्छ करावीत. बंदिस्त सभागृहात सर्वांनी मास्क बंधनकारक आहे. बंदिस्त सभागृहांमध्ये रंगभूषाकाराची आवश्‍यकता असेल तर त्यांनी पीपीई किट धारण करणे आवश्‍यक आहे. बंदिस्त सभागृहात प्रवेश करतेवेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणत्याही प्रेक्षकांना कलाकार कक्षात जाण्यास परवानगी देवू नये. कार्यक्रम संपल्यानंतर सभागृहाचे निर्जंतुकीकरण करावे. कोरोना जनजागृतीसाठी भित्तीपत्रके, उभे फलक लावावेत. सभागृह वातानुकुलित असेल अशा ठिकाणी तापमान 24 ते 30 अंश सेल्सिअस या मर्यादेत असले पाहिजे. खाद्य व पेय पदार्थ ज्या त्या ठिकाणी उपलब्ध करुन द्यावीत. प्रत्येक विक्री केंद्रांवर सुरक्षित अंतर राखावे. जमिनीवर चिकट पट्टया (स्टिकर) वापरून एक रांग पध्दतीचा अवलंब करावा. 

हे पण वाचा पदवीधर निवडणूक बेकायदेशीर ; अॅड. असिम सरोदे

 आयोजन व कार्यकमासाठी: 
सभागृहात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक राहील. वयाने ज्येष्ठ कर्मचारी, गर्भवती महिला कर्मचारी, ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे असे कर्मचारी यांना जास्त जनसंपर्क असलेल्या ठिकाणी कामासाठी नेमू नयेत. सर्वांनी आरोग्य सेतू ऍपचा वापर करावा. 

 मोकळ्या जागेतील कार्यक्रम : 
मोकळ्या जागेतील कार्यक्रमासाठी सहा फुट अंतरावरच लोक बसण्याची व्यवस्था करावी. त्यानुसार प्रेक्षक बसतील किंवा उभे राहतील. सभागृहात थूंकु नये. तंबाखूजन्य पदार्थ व पान हे बाळगू नये. नशीले पदार्थां व द्रव्यांचे सेवन करू नये. मार्किंगसाठी जागा असावी. ध्वनी प्रदुषण होणार नाही याची काळजी घ्यावी. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Closed halls open spaces allow other cultural events