मराठा हिस्ट्री गँलरी उभारणीसाठी 50 लाखांचा निधी; खासदार संभाजीराजेंकडून मुख्यमंत्र्यांचे आभार

संदीप खांडेकर 
Friday, 4 December 2020

छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना महाराजांनी जिंजी किल्ल्यावर ताबा मिळवला

कोल्हापूर - स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या जिंजी किल्ल्यास आज खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भेट दिली. यावेळी संभाजी राजे यांनी जिंजीच्या जतनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिंजी किल्ल्यावरील राजसदरेच्या संवर्धनासाठी व याठिकाणी मराठा हिस्ट्री गँलरी उभारणीसाठी तत्काळ ५० लाख रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले. याबाबत संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना महाराजांनी जिंजी किल्ल्यावर ताबा मिळवला. पूर्वी असलेला किल्ला पाडून नव्याने महाराजांंनी हा किल्ला बांधून घेतला.
 
मराठ्यांच्या इतिहासात दुर्गराज रायगडला जितकं महत्व आहे तितकंच महत्व जिंजीच्या किल्ल्यालासुध्दा आहे. शिवछत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेब स्वराज्यावर चालून आला. छत्रपती संभाजी महाराजांना फंदफितूरीने पकडून छळ करुन मारण्यात आले. त्यावेळी स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेले आणि तिथून  राज्यकारभार पाहू लागले. यामुळे औरंगजेबाला आपले निम्मे सैन्य दक्षिणेकडे पाठवावे लागले. परिणामी स्वराज्यावरील मुघल सैन्याचा दबाव कमी झाला व मराठ्यांनी गेलेले किल्ले व प्रदेश पुन्हा जिंकून घेतले.

जिंजीसारखा अभेद्य किल्ला पाहताना महाराजांच्या दूरदृष्टीची जाणीव पदोपदी होत होती. पूर्वी या ठिकाणी कृष्णगिरी, राजगिरी, चंद्रयान दुर्ग (चंद्रगिरी) हे वेगवेगळे तीन किल्ले होते. तिथे संरक्षणाच्या दृष्टीने तटबंदी बांधून तिघांचा मिळून एक किल्ला शिवाजी महाराजांनी केला.पाण्याच्या टाक्यांचा संरक्षणदृष्टया वापर अतिशय खुबीने केलेला आहे.

महाराष्ट्राचा हा ऐतिहासिक ठेवा जतन करुन  वस्तूसंग्रालय उभारण्यासाठी व राजसदरचे संवर्धन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ५०लाख रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले आहे. 

हे पण वाचाशेअर मार्केटमधून जादा परतावा मिळवू देण्याच्या अमिषाने 11 लाखांची फसवणूक

 

या संदर्भात अधिक माहीती देताना, छत्रपती संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पाऊलखुणा संपुर्ण देशभरात पसरलेल्या आहेत. त्याचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याची संपूर्ण जबाबदारी आपली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने जाणिव पुर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

हे पण वाचाशिक्षक किंवा पदवीधरची एक जागा कॉंग्रेसला द्या, ती निवडून आणतो असा "शब्द' पाटील यांनी दिला होता

 

जिंजी किल्ल्याला भेट  दिल्यानंतर मा. मुख्यमंत्री यांच्याशी याविषयी फोनवर सविस्तरपणे चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिंजी किल्ल्यावरील राजसदरेच्या संवर्धनासाठी व वस्तूसंग्रालय उभारणीसाठी तत्काळ ५०लाख रुपयाचा निधी देण्याचे मान्य केले आहे. मुख्यमंत्र्यांचे यासाठी विशेष अभार व्यक्त करतो.

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm uddhav thackeray Approved Fund of Rs 50 lakhs for setting up of Maratha History Gallery on jinji fort