संरक्षक कठड्याच्या रंगरंगोटीने ओढ्यावरच्या रस्त्याला नवा साज...

राजेश मोरे
गुरुवार, 9 जुलै 2020

मंगळवार पेठेतील ओढ्याच्या संरक्षक कठड्याची डागडुजी करून रंगरंगोटी केल्याने त्याला नवा लुक मिळाला आहे.

कोल्हापूर : मंगळवार पेठेतील ओढ्याच्या संरक्षक कठड्याची डागडुजी करून रंगरंगोटी केल्याने त्याला नवा लुक मिळाला आहे. रेणूका भक्तांसह वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे. मंगळवार पेठेतील ओढ्यावरील रेणूका मंदिरात दररोज भाविकांची मोठी गर्दी असते. 

नेहरूनगर, जवाहरनगर, सुभाषनगर, आर. के. नगर या भागातील नागरिकांनाही ओढ्यावरील रस्त्याचा आधार घ्यावा लागतो. पण ओढ्यावरील संरक्षक कठड्याची गेल्या काही महिन्यापासून चांगलीच दुरवस्था झाली होती. कठड्याचे लोखंडी अनेक खांब निकामी झाले होते. कठडेही अनेक ठिकाणी ढासळलेले होते. जराजरी वाहनांचा अंदाज चुकला तर अनर्थ होण्याची भिती निर्माण झाली होती. एकंदरीत हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता. 

पावसाळ्यात या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते. थोडा जरी पाऊस झाला तर वाहन धारकांसह पादचाऱ्यांना गुडघाभर पाण्यातून कसरत करतच या मार्गावरून ये-जा करावी लागत होती. याबाबत होणाऱ्या तक्रारीची दखल घेत ओढ्याजवळील रस्त्याच्या बाजूला मोठे नाले बांधले गेले. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहण्याचे व त्यामुळे रस्ता खराब होण्याचा प्रश्‍न मार्गी लागला. पण ओढ्यावरील संरक्षक कठड्याच्या दुरवस्थेची नागरिकांना चिंता लागून राहीली होती. या प्रश्‍नाचा "सकाळ'ने पाठपुरावा केला होता. याची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली. येथील संरक्षक लोखंडी अँगलची दुरुस्ती करून ढासळेले कठड्यांचीही डागडुजी केली. इतकेच नव्हे तर हे कठडे वेगवेगळ्या रंगाने रंगविण्यात आले आहे. त्यामुळे ओढ्यावरील पुलाला नवा लूक मिळाला आहे. 

दृष्टिक्षेप 
- संरक्षक कठड्याचे खांब निकामी, अनेक ठिकाणी भाग ढासळला 
- ओढ्यावरच्या संरक्षक कठड्याला नवा लूक 
- रेणुका भक्तांसह नागरिकांमधून समाधान 
- पाऊस झाला की, रस्त्यावर गुडघाभर पाणी

 (संपादन : प्रफुल्ल सुतार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: color of protective wall; road decoration