असा होणार विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करू...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

शिक्षक समितीच्या चर्चासत्रात पालकांना आश्‍वासन...

कसबा तारळे (कोल्हापूर) - आजची कोरोना संसर्गाची स्थिती पाहता पाहिले शैक्षणिक सत्र वाया जाण्याचीच शक्‍यता असली तरीही या वर्षाचे एक सत्र शिल्लक आहे. त्यामुळे हे एक सत्र व पुढील वर्षाची दोन सत्रे, अशा तीन सत्रांमध्ये जास्तीत जास्त सुट्यांचा वापर करून दोन वर्षांचा अभ्यासक्रम शिक्षक पूर्ण करतील. पालकांनी मुलांच्या शैक्षणिक नुकसानीची चिंता सोडून निश्‍चिंत राहावे, असे आश्वासन प्राथमिक शिक्षक समितीने पालकांना दिले असल्याची माहिती समितीचे राज्य ऑडिटर राजेंद्र पाटील यांनी पत्रकारांना दिली.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत पालकांसह शिक्षकही चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘कोरोना काळातील आणि कोरोनानंतरची शिक्षणातील आव्हाने’ यावर शिक्षक समितीने ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले होते. यात कोरोना काळात मुलांच्या शिक्षणासंदर्भात गांभीर्याने चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणात अनेक अडचणी येत आहेत. ऑफलाईन स्वयंअध्यन व स्वाध्याय पद्धतीने मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचा प्रयत्नही अनेक शाळांमध्ये होत आहे. अनेक शैक्षणिक व्हिडिओंची निर्मिती करून मुलांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीही हे मार्ग बेभरवशाचेच वाटत आहेत. म्हणून शिक्षक समिती विद्यार्थ्यांप्रती बांधील राहील, असा चर्चेचा सूर निघाला.
या चर्चासत्रात आयफेटोचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे, राजेंद्र पाटील, जोतिराम पाटील, प्रमोद तौंदकर, सुभाष विभुते, सुनील सुतार,  प्रकाश कानकेकर, विक्रम वागरे, आनंदा पाटील, विनायक चौगले, नारायण आयरे, उत्तम फराकटे, विक्रम पाटील, सागर परीट आदींनी सहभाग घेतला.

वाचा - मिटींग संपली आणि साहेबच आले कोरोना पॉझिटिव्ह !

मेसेज आंदोलन करणार

या वेळी टीव्हीवर सुरू असलेल्या ‘टिली- मिली’ कार्यक्रमाचे सॉफ्टवेअर ३०० रुपयांना विकून सरकार मोफत शिक्षण हक्क कायद्याचा भंग करीत असून, मुलांना हे सॉफ्टवेअर मोफत मिळावे व मुलांना स्वयंअध्ययनासाठी सर्व विषयांच्या स्वाध्याय पुस्तिका मिळाव्यात, अशी मागणी पालकांतर्फे करण्यात आली. गरज भासली तर या मागण्यांसाठी ई-मेल व ट्विटरच्या माध्यमातून मेसेज आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complete the education course in three sessions