सव्वाचार मिनिटांत केली हृदयाची झडप उघडण्याची शस्त्रक्रिया...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

हृदयाकडे जाणाऱ्या डाव्या बाजूची मुख्य झडप बंद असल्याने गर्भवतीत धाप लागणे, चक्कर येणे, चालताना दम लागणे अशी लक्षणे दिसत होती. वास्तविक अशी लक्षणे असताना गर्भवतीची शस्त्रक्रिया करणे ही जोखमीची बाब असते. मुख्य झडप बंद असल्यामुळे ती उघडण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार होती.

कोल्हापूर - सीपीआर रुग्णालयाच्या हृदयशस्त्रक्रिया विभागात गर्भवतीच्या हृदयाकडे जाणारी मुख्य झडप उघडण्याची (बलून मायट्रल व्हॉल्वोटॉमी) विनाछेद शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. अवघ्या सव्वाचार मिनिटांत ही शस्त्रक्रिया झाली. सहा आठवड्यांची गर्भवती आणि तिच्या बाळाची प्रकृती आता सुधारली असून, संभाव्य बाळंतपण यशस्वी होऊ शकते. गारगोटी येथील मेघा गुरव असे तिचे नाव आहे, अशी माहिती रुग्णालयातील हृदय चिकित्सक डॉ. अक्षय बाफना यांनी आज ‘सकाळ’ला दिली.   

सीपीआर हृदय विभागाची सव्वाचार मिनिटांत कामगिरी

हृदयाकडे जाणाऱ्या डाव्या बाजूची मुख्य झडप बंद असल्याने गर्भवतीत धाप लागणे, चक्कर येणे, चालताना दम लागणे अशी लक्षणे दिसत होती. वास्तविक अशी लक्षणे असताना गर्भवतीची शस्त्रक्रिया करणे ही जोखमीची बाब असते. मुख्य झडप बंद असल्यामुळे ती उघडण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार होती. त्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार होते. याच काळात या गर्भवतीने खासगी रुग्णालयात तपासणी व उपचार घेतले. त्यासाठी दोन लाखांचा खर्च आल्याने अखेर तिच्या कुटुंबीयांनी तिला सीपीआर रुग्णालयाच्या हृदयशस्त्रक्रिया विभागात दाखल केले.

वाचा - होस्टेल, रूममध्ये राहणाऱ्यांना टोळक्‍यांचा उपद्रव 

त्यानंतर डॉ. बाफना व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासणी केली. गांभीर्य ओळखले तसेच शस्त्रक्रियेबाबत निर्णय घेतला. त्यास गर्भवतीच्या नातेवाईकांनीही मान्यता दिली. त्यानंतर विनाछेद शस्त्रक्रिया करण्यात आली. कोणतीही भूल न देता कॅथलॅब रेडीएशनच्या तीव्रता कमी करीत शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. त्यात महिलेसह बाळाच्या प्रकृतीला कोणताही बाधा पोहचली नाही. किंबहुना तशी खबरदारी घेत शस्त्रक्रिया यशस्वी केली, असे डॉ. बाफना यांनी सांगितले.  

हृदयाकडे जाणाऱ्या डाव्या बाजूची झडप बंद असणे आणि त्यातही ती गर्भवती असणे, यात ५० ते ६० टक्के मृत्यूचा धोका असतो, तरीही आधुनिक तंत्र, अनुभव, कौशल्य व सांघिक परिश्रमातून ही शस्त्रक्रिया यशस्वी करणे शक्‍य झाले. त्यासाठी सीपीआरमधील अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, हृदयशस्त्रक्रिया विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. रोहित श्रीवास्तव, डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. मारुती पवार, सर्जन डॉ. माजिद मुल्ला, भूपेंद्र पाटील, डॉ. अशोक धिवरे यांची मोठी मदत झाली.
- डॉ. अक्षय बाफना, हृदय चिकित्सक, सीपीआर 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Convulsive heart surgery performed in four minutes