esakal | Video -पर्यटकांना भूरळ घालणारा गगनबावडा यंदा का आहे सुना सुना?
sakal

बोलून बातमी शोधा

corona infected of Gaganbawada Tourism

शेतीचे प्रमुख आगार असलेल्या या तालुक्‍यात शेतीकामाला मात्र वेग आला आहे.

Video -पर्यटकांना भूरळ घालणारा गगनबावडा यंदा का आहे सुना सुना?

sakal_logo
By
मोहन मेस्त्री

कोल्हापूर - गगनबावडा म्हणजे जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडणारा तालुका. सह्याद्रीच्या हिरव्यागार रांगा आणि तेथील धुकं साऱ्यांनाच भुरळ घालतं. येथे कोसळणारा धो धो पाऊस तर पर्यटकांना प्रत्येक वर्षी हमखास खुणावतो. सिंधूदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेला करुळ घाट म्हणजे तर वर्षा पर्यटनासाठी सहकुटूंब जाण्याचं हक्काचे ठिकाण. या संपूर्ण परिसराने आता जणू हिरवा शालू परिधान केला आहे आणि निसर्गाची मुक्त उधळण यानिमित्ताने साऱ्यांनाच अनुभवायला मिळते आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात एकत्रीतपणे फिरवण्यावर बंधने असल्याने घाटरस्ता अजूनही स्पर्शहीन आहे.


हा घाट  जणू कोल्हापूरकरांच्या प्रतिक्षतेच आहे. या घाटातून कोसळणाऱ्या अनेक लहानमोठ्या धबधब्याखाली भिजण्यासाठी लोक आसुसले आहेत. पण शासनाच्या बंदी आदेशामुळ अजून तरी फारशी गर्दी येथे दिसत नाही. 

तरीपण शेतीचे प्रमुख आगार असलेल्या या तालुक्‍यात शेतीकामाला मात्र वेग आला आहे. गेल्या आठ दिवसातील पावसाच्या हजेरीमुळे तालुक्‍यातील शेतकरी सुखावला आहे. लालभडक मातीच्या पार्श्‍वभूमीवर हिरव्यागार शिवारात माणसांची लगबग वाढली आहे.

हे पण वाचा - कोल्हापूर जिल्ह्यातील 6 मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु


भर पावसात भातासाठी चिखल गुठ्ठा करणाऱ्या बैलजोडीच्या मागून फ़िरणारा शेतकरी आणि या लालभडक शेतात भात लावणी करणाऱ्या या कष्टकऱ्यांचं राबणं सुध्दा आजवर अनेक चित्रकार, छायाचित्रकारांच्या कलाकृतींचा विषय ठरलं आहे.... आणि म्हणूनच त्यांची वर्दळ मात्र या परिसरात वाढू लागली आहे. हिरव्यागार कॅनव्हासच्या पार्श्‍वभूमीवर विविधरंगी प्लास्टिकच्या कागदांचं पांघरून डोईवर घेवून राबणाऱ्या या बाया-बापड्या श्रमगंगेला प्रसन्न करताहेत आणि निढळाच्या घामाचं हे प्रतिक अनेकांच्या कॅमेऱ्यातही आपसूकच बंदिस्त होवू लागलं आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे