दिलासादायक ; इचलकरंजीत कोरोनाची साखळी तुटली ; आज एकही रूग्ण नाही 

पंडित कोंडेकर
Monday, 19 October 2020

सुरुवातीच्या काळात राज्यात सर्वाधिक मृत्यूदर इचलकरंजीत होता. त्याची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली होती.

इचलकरंजी - तब्बल 118 दिवसानंतर शहरात आज कोरोना रुग्ण सापडण्याची मालिका खंडीत झाली. त्यामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला. दिवसभरात एकाही नव्या रुग्णाची नोंद पालिका प्रशासनाकडे झाली नाही. तर दिवसभरत दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली. 

सध्या शहरात फक्त 47 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात सर्वप्रथम इचलकरंजी शहरात कोरोनाचा समुह संसर्ग झाला होता. कुडचे मळा येथून 23 जून रोजी सुरु झालेल्या कोरोना संसर्गाचा पुढील कांही दिवसांत उद्रेक झाला होता. त्यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडला होता. वाढत्या संख्येमुळे बेड मिळणेही मुश्कील झाले होते. तर सुरुवातीच्या काळात राज्यात सर्वाधिक मृत्यूदर इचलकरंजीत होता. त्याची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली होती. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाय योजना केल्या होत्या.

अगदी जिल्हा शल्य चिकित्सकांचे मुख्यालयही आयजीएम रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आले. पालिकेच्या माध्यमातून कोविड केअर सेंटरची सुविधा ठिकठिकाणी सुरु करण्यात आली. आरोग्य विभागाची यंत्रणा तर अवितर कार्यरत होती. कुडचे मळा हॉटस्पॉट झाल्यानंतर त्याचे लोण शहरभर पसरले. प्रत्येक भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येवू लागले. कार्यरत रुग्णांची संख्या अकराशेच्याजवळ आली होती. त्यानंतर मात्र कार्यरत रुग्णांची संख्या कमी होत गेली. गेल्या महिन्याभरात संख्या कमी होत राहिली.

साधारणपणे दररोज 2 ते 8 रुग्ण मिळून येत होते. पूर्वी ही संख्या किमान 50 च्या पुढे होती. मात्र आज एकाही नविन कोरोना रुग्णाची नोंद पालिका प्रशासनाकडे झाली नाही. तब्बल 118 दिवसानंतर एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे शहरवासियांना कोरोना संकटात मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासन पातळीवर केलेल्या उपाय योजना आणि नागरिकांनी घेतलेली खबरदारी यामुळे कोरोनावर वेळेतच वस्त्रनगरीत नियंत्रण आणता येणे शक्य झाले.

हे पण वाचाब्रेकिंग - कोल्हापूरचा शाही दसरा यावर्षी रद्द

कोरोना आकडेवारी दृष्टीक्षेप

एकूण कोरोना रुग्ण ---3952
आज अखेर कोरोनामुक्त ---3711
एकूण बाधीत मृत ----194
अ‍ॅक्टीव्ह रुग्ण ---47
 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patient in found in ichalkaranji