मोठी बातमी ; अंत्यसंस्काराहून परतत असताना त्याला कोरोना असल्याचे समजले अन्...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

अंत्यसंस्काराला हजर असलेल्या वीस जणांना पंचगंगा स्मशानभूमीतच रोखून ठेवले असून पाच जण तीव्र संपर्कात आले आहेत. 

इचलकरंजी (कोल्हापूर) : अत्यवस्थ असलेल्या येथील गावभागातील नागरिकास उपचारास नेताना त्याचे निधन झाले. सायंकाळी नातेवाईकांनी इचलकरंजी येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले आणि अंत्यसंस्कारातून नागरिक परतत असतानाच मयत व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा मेसेज आला. त्यामुळे गावभागात प्रचंड खळबळ माजली आहे. अंत्यसंस्काराला हजर असलेल्या वीस जणांना पंचगंगा स्मशानभूमीतच रोखून ठेवले असून पाच जण तीव्र संपर्कात आले आहेत. 

शहरातील गावभाग येथील अवधुत आखाडा (त्रिशुल चौक) या परिसरातील एक व्यक्ती गेले तीन-चार दिवस आजारी होती. आज या व्यक्तीची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी येथील शासनाच्या आयजीएम सामान्य रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रूग्णालयात नेण्यात येत होते. मात्र उपचारापूर्वीच या व्यक्तीचे निधन झाले. 

तापसह अन्य संशयीत आजार असल्यामुळे या व्यक्तीचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी घेण्यात आले होते. दरम्यानच्या काळात रूग्णालयाने हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता. नातेवाईकांनी सायंकाळी येथील पंचगंगा नदी काठावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार सुरू असतानाच रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यामुळे गावभागात प्रचंड खळबळ माजली आहे.

हे पण वाचा -  धक्कादायक ; कोरोनाच्या भीतीने शिक्षकाने सासुरवाडीतच घेतला गळफास अन्...

 

दरम्यान या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांना तातडीने प्रशासनाने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona positive patient dead in kolhapur ichalkaranji