esakal | साहेब, लस आली का हो ? जयसिंगपुरात नागरिकांकडून होतेय विचारणा

बोलून बातमी शोधा

corona vaccination not available in kolhapur jaysingpur people left from hospital

दिवसभरात एक हजार लसीकरणाची क्षमता असलेल्या या केंद्रात प्रशासनाने तातडीने पुरेशी लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. 

साहेब, लस आली का हो ? जयसिंगपुरात नागरिकांकडून होतेय विचारणा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर (कोल्हापूर) : जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केलेल्या जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीचा अनियमित पुरवठा होत असल्याने नागरिकांना चौकशी करून माघारी फिरावे लागत आहे. साहेब, लस आली का हो? अशी विचारणा करून नागरिकांना घरचा रस्ता धरावा लागत आहे. एका बाजूला जागरुकपणे लस घेण्यासाठी नागरिक पुढे येत असताना प्रशासनाकडून मात्र पुरेशी लस उपलब्ध करून दिली जात नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दिवसभरात एक हजार लसीकरणाची क्षमता असलेल्या या केंद्रात प्रशासनाने तातडीने पुरेशी लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. 

जिल्ह्यात शिरोळ तालुक्‍यात लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शिरोळ तालुक्‍याच्या दौऱ्यात प्रशासनाची खरडपट्टी करताना जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामाची प्रशंसा केली होती. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांच्या नियोजनबद्ध लसीकरणामुळे नागरिक आता पुढे येत आहेत. पालिका प्रशासनासह नगरसेवकांनीही यात पुढाकार घेतल्याने नागरिकांच्या रांगा लसीकरणासाठी लागल्या आहेत. मात्र, रांगेत असलेल्यांना लस मिळेलच अशी स्थिती नाही. लस कधी संपेल याची खात्री नसल्याने नागरिकांमध्ये लसीबाबत धाकधूक लागून राहात आहे. 

व्यापारी शासनाच्या नियमांना आधीन राहून व्यवसाय करण्यासाठी लसीकरणासाठी आरोग्य केंद्राकडे धाव घेत असल्याने आरोग्य केंद्रापुढील रांगेत आता व्यापाऱ्यांचीही गर्दी दिसू लागली आहे. खासगी रुग्णालयांमध्येही लसीची टंचाई निर्माण झाली असल्याने पैसे मोजूनही मिळत नसल्याचे चित्र शहरातील खासगी रुग्णालयात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाला प्रारंभ झाल्यापासून लस पुरवठ्यातील अनियमिततेचा नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे.

हेही वाचा - कोल्हापुरात कामगारांची आरटीपीसीआर ऐवजी एंन्टीजेन टेस्ट होणार; प्रशासनाकडून निर्णय

आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामाबद्दल जिल्हा प्रशासनासह नागरिकांमध्ये समाधान असताना लस उपलब्ध नसल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांचा हिरमोड होत आहे. लसीकरणासाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने या ठिकाणी दररोज एक हजार लसीचा पुरवठा करण्याची गरज आहे. 

"शहर आणि परिसरातील गावांमध्ये लसीकरणाबद्दल नागरिक, व्यापाऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण केली आहे. लस पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री पटवून दिल्यामुळे आता ते लसीकरणासाठी येत असताना प्रशासनाकडून पुरेशी लस उपलब्ध करून दिल्यास लसीकरणाचे काम अखंडितपणे सुरू राहील.'

- डॉ. पांडुरंग खटावकर, वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र, जयसिंगपूर