न्यालयीन कामकाज आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

वेगवेगळ्या गुन्ह्यातील संशयिताना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करावे लागते. अशा संशयितांना थेट व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया आता जिल्हा पोलिस दलाने सुरू केली आहे.

कोल्हापूर - कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्याच्या बंदोबस्तासाठी सुमारे 90 टक्के पोलिस दल बंदोबस्तात आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यातील संशयिताना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करावे लागते. अशा संशयितांना थेट व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया आता जिल्हा पोलिस दलाने सुरू केली आहे. गर्दी टाळण्याबरोबर पोलिसांच्या वेळेची व श्रमाची बचत होत आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. संचारबंदीत गर्दी टाळा असे आवाहन पोलिस दलाकडून केले जात आहे. केवळ अत्यावश्‍यक सेवे व्यतिरिक्त रस्त्यावर फिरणाऱ्यांना मज्जाव केला जात आहे. बंदोबस्तासाठी जिल्ह्यातील 90 टक्के पोलिस हे रस्त्यावर अहोरात्र बंदोबस्तात आहेत. अशावेळी जिल्ह्यात घडणाऱ्या वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपासही पोलिस दलाकडून सुरू आहे. यात संशयितांना अटक करण्याचीही प्रक्रिया त्यांच्याकडून केली जात आहे. अशा संशयितांना अटकेनंतर न्यायालयात हजर करावे लागते. तपासासाठी पोलिस कोठडी मागावी लागते. पण कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळायची आहे. संशयितांना न्यायालयात ने-आण करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळही उपलब्ध नाही. तसेच न्यायालयाकडूनही पोलिसांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयीन कामकाज करण्यास सहमती दिली जात आहे. त्यानुसार सध्या जिल्हा पोलिस दल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संशयितांना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया पोलिस ठाण्यात बसूनच करत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Courtship work now through video conferencing