‘दिलदार कोल्हापूरचे दमदार वचन ; कुठं बी लागू दे रक्त, मी हाय की..!

मोहन मेस्त्री
Wednesday, 28 October 2020

एकवटले तरुण; मोहिमेतून रक्त संकलन, प्रबोधन
 

कोल्हापूर : कोरोनाची लाट कमी झाली असली तरी दुसरी लाट येते की काय, अशी भीती आहे. सहा महिन्यांत वैद्यकीय यंत्रणा कोरोना महामारीत व्यस्त आहे. थांबलेल्या शस्त्रक्रिया सुरू झाल्यामुळे रक्ताचा तुटवडा येणार आहे. यापुढे बेड, डॉक्‍टर असतील, पण रक्ताचा तुटवडा जाणवण्याची शक्‍यता आहे. सहा महिन्यांत अनेक रक्तदात्यांनी रक्त देऊन कोटा पूर्ण केला आहे, किमान तीन-चार महिने ते रक्त देऊ शकणार नाहीत. या समस्येवर मात करण्यासाठी कोल्हापुरातील काही युवकांनी  ‘मी हाय की’! हे ब्रीद घेऊन एकत्र येत रक्तसंकलन आणि प्रबोधन मोहीमच सुरू केली आहे. 

यासाठी आरोग्य मंत्रालयाने रक्तदान आणि प्लेटलेट दान प्रसारासाठी  ‘गुडवील अँबेसिडर’ केलेला विश्‍वजित काशीद याने पुढाकार घेतला आहे. त्याच्यासोबत काही युवकांची टीम काम करत आहे.

‘कोल्हापूरवर संकट मी हाय की, ‘दिलदार कोल्हापूरचे दमदार वचन, मी हाय की, ‘ कुठं बी लागू दे रक्त मी हाय की..!’ अशा रांगड्या कोल्हापुरी भाषेच्या स्लोगनखाली ही मोहीम कार्यरत आहे.  जिल्ह्याची लोकसंख्या १५ लाखांपर्यंत असताना रक्तदाते २० ते २२ हजारांपर्यंत आहेत. जिल्हा प्रशासनाकडे केवळ अडीच हजार ते तीन हजार रक्तदात्यांची यादी आहे. शहरात सहा हजार रक्तदाते आहेत. त्यातही  बहुतांशी रक्तदाते तिशी ओलांडलेले आहेत. देशात १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला मोठी रक्तदान शिबिरे होतात. यातून सुमारे ३५ टक्के रक्त ओतून टाकले जाते, हे भयानक वास्तव आहे, परंतु जिल्हा प्रशासनाकडून याचे नियोजन होत नाही. यासाठी तरुणांच्या या मोहिमेतून रक्ताबाबतचा प्रबोधन जागर होणार आहे.

 हेही वाचा- जीआय मानांकनात कोल्हापुरी गुळाचा समावेश ;  राज्य कृषी पणन विभागातर्फे चार योजना -

हे करणार प्रबोधन
* १८ ते २५ वयोगटातील रक्तदाते तयार करणे
* युवकांना ब्लड बॅंकेची समक्ष माहिती देणे
* त्यांना ‘रक्त साक्षर’ करणे 
* रक्‍तदान कधी करायचे, प्लेटलेट दानबाबत प्रसार
* रक्त किंवा प्लाझ्माची शुद्धता ओळखण्याच्या टीप्स देणार
*२९ आणि ३० ऑक्‍टोबर रोजी महारक्तदान मेळावा

 

थांबलेल्या शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवणार आहे. सहा महिन्यांत अनेकांनी रक्त देऊन कोटा पूर्ण केला आहे, किमान तीन-चार महिने ते रक्त देऊ शकणार नाहीत. या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही ‘मी हाय की’! हे ब्रीद घेऊन एकत्र येत रक्तसंकलन, प्रबोधन मोहीमच सुरू केली आहे.
- विश्‍वजित काशीद, प्लेटलेट दाता

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 fight blood donation campaign kolhapur