नियोजन सुरू,अलर्ट जारी:  कोल्हापुरात उच्चांकी रुग्णसंख्येवर उपचार आराखडा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

कोरोना दुसरी लाट शक्‍य;  जिल्हा प्रशासनाने नियोजनास केली सुरुवात
                                                         

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने नियोजनास सुरुवात केली आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सर्व तालुका आरोग्य अधिकारी, तसेच खासगी रुग्णालयांशी संपर्क सुरू केला आहे. मागील आठ महिन्यांत एका दिवसात जी उच्चांकी रुग्णसंख्या झाली होती, त्यामध्ये १० टक्‍के वाढ धरून बेडचे नियोजन केले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकाच दिवसात १२०० रुग्ण सापडले होते. आता साधारणपणे १३०० ते १४०० रुग्ण गृहीत धरून बेड, ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात येणार आहे.देशात काही ठिकाणी कोरोनाची तिसरी, तर काही ठिकाणी दुसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

राजधानी दिल्ली येथे कोरोनाची तिसरी लाट व त्या अनुषंगाने लॉकडाउनचे नियोजन सुरू झाल्यानंतर राज्याच्या आरोग्य यंत्रणेनेही आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाला याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्याचा आरोग्य विभाग कामाला लागला आहे. जिल्ह्यात मागील आठ महिन्यांपासून आजअखेर कोरोनाचे ४८ हजार ७७३ रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत ४६ हजार ५११ रुग्ण कोरोना मुक्‍त झाले आहेत. कोरोनामुळे आजअखेर १६६८ रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. जिल्ह्यात १५ ऑक्‍टोबरपासून रुग्णसंख्या कमी होत गेली.

हेही वाचा- कोरोनामुळे म्हशींचा रोड शो, मिरवणुकींना फाटा -

कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असतानाच जनजीवन पूर्वपदावर येत आहे. विविध सण व उत्सवांमुळे आता रस्त्यावर व बाजारपेठांमध्ये गर्दी आहे. गर्दीत बरेच लोक कोरोनाबाबतच्या सूचनांचे पालन करत नाहीत. परिणामी दुसरी लाट येण्याची भीती आहे. दिल्लीचा अनुभव विचारात घेऊन आणि उच्चांकी रुग्ण गृहीत धरून तयारी सुरू आहे. दिवसात १३०० ते १४०० रुग्ण दाखल झाले, तर यातील ४० टक्‍के रुग्णांवर घरीच उपचार केले जाणार आहेत. ४५ टक्‍के रुग्ण कोविड सेंटरमध्ये, तर १२ टक्‍के लोकांना ऑक्‍सिजन, तर तीन टक्‍के लोकांना व्हेंटिलेटर लागण्याची शक्‍यता गृहीत धरून ही तयारी सुरू आहे.

 

कोरोनाची संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेऊन उपलब्ध साधनसामग्री म्हणजे बेड, ऑक्‍सिजन बेड, व्हेंटिलेटर याची व्यवस्था तपासण्यात येत आहे. ही यंत्रणा पुरेशी असेल, तर ती सर्व कार्यान्वित करणे किंवा कमी पडत असेल तर त्यासाठी तरतूद करण्याच्या अनुषंगाने आढावा सुरू झाला आहे. आठवडाभरात सर्व तयारी पूर्ण होईल.
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 second wave Planning started by district administration Alert issued