ताटांचे गणित बसेना ; धड पार्सलही नाही आणि हॉटेलमध्ये बसण्यासाठी परवानगी नाही, करायचे काय...?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

पार्सल सुविधा रात्री नऊपर्यंतच; कोरोनाने विस्कटली घडी

 

कोल्हापूर : हॉटेल सुरू ठेवावे तरी अडचण, बंद करावे तरी अडचण, अशी अवस्था शहरातील हॉटेलचालकांची झाली आहे. पार्सल देण्याची वेळ रात्री नऊपर्यंतच आहे. धड पार्सलही जात नाही आणि हॉटेलमध्ये बसण्यासाठी परवानगी दिली जात नाही अशा विचित्र स्थितीत हॉटेलचालक सापडले आहेत.
लॉकडाऊनमुळे मार्चपासून पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. अंबाबाई मंदिर परिसरात मोठ्या संख्येने हॉटेल अथवा नाश्‍त्याची सेंटर उभी राहिली त्यामागे पर्यटक हेच कारण होते. ज्यांच्या जोरावर हॉटेल सुरू केले ते गिऱ्हाईक नसल्याने हॉटेलमालक अडचणीत आले आहेत.

चार मे रोजी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर पहिल्यांदा सायंकाळी पाचनंतर सातपर्यंत हॉटेल सुरू राहिली. मांसाहारी अथवा शाकाहारी जेवणाचा बेत रात्रीच आखला जातो. नऊनंतर गिऱ्हाईक येण्यास सुरवात होते. रात्री अकरापर्यंत खानावळी गजबजून जातात. मंगळवार पेठेनंतर आता ताराबाई रोड परिसरातही हॉटेल संख्येत वाढ झाली आहे. यात मांसाहारी हॉटेलची संख्या अधिक आहे. स्थानिक लोकांना हॉटेलमध्येच जेवणाचा आस्वाद घेण्याचा पूर्वीपासून सवय आहे. मांसाहारी जेवण असेल तर दहानंतरच हॉटेलमध्ये जाण्यास पसंती दिली जाते. अनलॉक चारमध्ये हॉटेलची पार्सल देण्याची वेळ नऊपर्यंत निश्‍चित केली.

हेही वाचा- नियमित आहारात अंडी खाताय मग ही बातमी वाचाच....

दररोज अमुक एवढी ताटे जाणार असे हॉटेलमालकांचे गणित असते. नऊपर्यंत पार्सलच्या अटीमुळे नेमके किती ताटे जातील याचा अंदाज येत नाही. हॉटेलमध्ये गिऱ्हाईक बसलेले आढळून आल्यास दंडाची भीती आहे. दंडाची रक्कमही हलकी नाही. त्यामुळे शटर ओढून पार्सलची सुविधा सुरू आहे. शटर कायमचे डाऊन करण्यापेक्षा किमान घर खर्च तरी चालू दे या आशेवर पार्सल व्यवसाय तोट्यात असूनही हॉटेलमालकांना तो करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

हेही वाचा- सात क्रमांक ठरला  ‘आर्मी सप्लायर’ घाटगे यांचा लकी नंबर -
सध्या फुल्ल बिर्याणीचा दर १८० रुपये आहे. मटणाच्या ताटाचा दर १८० ते १९० असा आहे. चिकन ताटाचा दर १५० रुपयापर्यंत आहे. पूर्वी रात्री अकरापर्यंत चालणारी हॉटेल नऊलाच बंद होऊ लागली आहेत. बड्या हॉटेलमध्ये अजूनही रेस्टारंट सुरू करण्यास परवानगी नाही. त्यामुळे ते ही अडचणीत आहेत.

संपादन -  अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid impact Parcel facility only until nine at night but bad impact Hoteliers