esakal | सात क्रमांक ठरला ‘आर्मी सप्लायर’ घाटगे यांचा लकी नंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Ghatge family has written 1600 numbers on the number plate of each vehicle

उद्योगातील विश्वासार्हता, व्यावसायिकता, वक्तशीरपणा, स्वयंशिस्त यावर तेज घाटगे यांचा कटाक्ष राहिलाय.

सात क्रमांक ठरला ‘आर्मी सप्लायर’ घाटगे यांचा लकी नंबर

sakal_logo
By
संदीप खांडेकर

 कोल्हापूर :  वसंतराव घाटगे वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक. घरच्या व्यवसायासाठी ट्रकचालकाचे काम त्यांच्या वाट्याला आले. टेंबलाई टेकडीवरील राजाराम रायफल्स नावाची पायदळाची तुकडी होती. त्या लष्करी केंद्राला लाकूड पुरविण्याचे कंत्राट घाटगे-पाटील कंपनीला मिळाले. राजारामपुरीत त्यांचा एक पेट्रोल पंप होता. ‘आर्मी सप्लायर’ म्हणून त्यांची शहरात ओळख होती. उद्योग विस्तारासाठी त्याचा त्यांना फायदा झाला. त्याच काळात घरात अॅम्बसिडरचे थाटात स्वागत झाले. श्री. घाटगे यांची सात क्रमांकावर श्रद्धा होती. गाडीवरील १६०० नंबरची बेरीज सात होती. पुढे हा क्रमांक घाटगे कुटुंबीयांना समृद्ध करणारा ठरला. घाटगे कुटुंबातील प्रत्येक गाडीवरील नंबर प्लेटवर १६०० क्रमांक लिहिण्याचा पायंडा पडलाय. 

वसंतराव घाटगे यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. घाटगे ग्रुप ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक बनलाय. घाटगे घराण्यातील तिसरी पिढी व्यवसायात उतरली आहे. वसंतरावांचा मुलगा सतीश घाटगे यांनी यशस्वीपणे व्यवसाय हाताळला. तोच वारसा त्यांचा मुलगा तेज घाटगे चालवत आहेत. माई हुंडाई,  रेनॉल्ट रोहर्ष, चेतन मोटर्स व माय टीव्हीएस कंपन्यांचे संचालक म्हणून त्यांच्याकडे कार्यभार आहे. आजोबा व वडिलांच्या व्यावसायिक गुणांचे प्रतिबिंब त्यांच्यात उमटले आहे. न्यू पॅलेस परिसरातील शाहू विद्यालयात ते दहावीपर्यंत शिकले. ऑस्ट्रेलियात त्यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचा डिप्लोमा पूर्ण केला. क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ. ऑस्ट्रेलियात त्यांनी क्रिकेटमधील कौशल्य दाखवताना स्टेट लेव्हलपर्यंत मजल मारली.

हेही वाचा- लाॅकडाऊनच्या काळात तब्बल एवढ्या मुलींनी सोडले घर -


टाटा मोटर्समध्ये २००२ ला ते ट्रेनी म्हणून होते. दोन वर्षांनंतर चेतन मोटर्सची सूत्रे त्यांच्याकडे आली.  ग्रामीण भागात आऊटलेट सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तो सक्‍सेस झालाय. घाटगे ग्रुपने कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये डीलरशिप सुरू केली आहे. व्यवसायाचा विस्तार होत असताना घाटगे कुटुंबीयांत नव्या गाड्यांची खरेदी होणे सहाजिकच होते. आजोबांनी घेतलेल्या नंबरवर सर्वांचा विश्वास होता. हुंडाईच्या सर्व गाड्या घाटगे कुटुंबीयांत आल्या. त्यांच्या नंबरप्लेटवर १६०० क्रमांकाला स्थान दिले आहे. 


उद्योगातील विश्वासार्हता, व्यावसायिकता, वक्तशीरपणा, स्वयंशिस्त यावर तेज घाटगे यांचा कटाक्ष राहिलाय. ग्राहकांची नाडी ओळखण्याचे सूत्रही त्यांनी जाणलंय. मोटर्सची जबाबदारी खांद्यावर पेलण्यापूर्वी टीव्हीएसच्या महिन्याला पन्नास गाड्यांची विक्री ठरलेली होती. व्यवसायाचे हे चक्र गतिमान करण्यासाठी त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. 

हेही वाचा- चला, ओझोनचे संरक्षण करूया ; निसर्गमित्र संस्थेतर्फे विविध कृती कार्यक्रम -


महिन्याकाठी ५५० ते ६०० गाडी विक्रीचा आकडा त्यांनी साध्य केला. ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा त्यांचा उद्देश आहे. कर्मचाऱ्यांना सतत उत्साही ठेवण्यात ते कमी पडत नाहीत. तेज घाटगे म्हणाले, ‘व्यवसाय वृद्धीसाठी आवश्‍यक ती खबरदारी घेतो. त्याचप्रमाणे गाड्यांच्या नंबरसाठी १६०० क्रमांकावर शिक्कामोर्तब करण्यावर लक्ष ठेवतो. १६ सप्टेंबर ही माझी जन्मतारीख आहे. त्यामुळे आमच्या गाड्यांवरील नंबरला विशेष महत्त्व आहे.’

संपादन -  अर्चना बनगे