
राजारामपुरी कोल्हापूर व रुकडी (ता. हातकणंगले) येथील दोघांचा गोवा येथे घाऊक कपड्यांचा व्यापार आहे.
हातकणंगले (कोल्हापूर) : गोव्यातून भाडोत्री घेतलेल्या मोटारी गहाणवट ठेवून त्यातून लाखो रुपयांची वरकमाई करणारी एक टोळी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत सक्रिय असून, यामागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापैकी काही मोटारी शहापूर पोलिसांनी शोधून काढून मूळ मालकांच्या ताब्यात दिल्या आहेत. यातील संशयितांमध्ये कोल्हापूर, रुकडी, हातकणंगले, हेरलेतील काही जणांचा समावेश आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी
राजारामपुरी कोल्हापूर व रुकडी (ता. हातकणंगले) येथील दोघांचा गोवा येथे घाऊक कपड्यांचा व्यापार आहे. यानिमित्त त्यांना नेहमीच मोटारीची गरज लागते. यातून मोटारी भाड्याने देणाऱ्या काही जणांशी त्यांची ओळख होती. लॉकडाउनपूर्वी त्यांनी काही गाड्या भाड्याने घेतल्या व ते कोल्हापुरात आले. याच दरम्यान लॉकडाउन सुरू झाल्याने त्यांनी त्याचा गैरफायदा घेत यातील मोटारी कोल्हापूर, सांगली, हातकणंगले परिसरातील काही जणांकडे गहाणवट ठेवून लाखो रुपये उचलले.
हेही वाचा- वीज जोडणी तोडून दाखवाच !
दरम्यान, मोटार आणि भाडेकरू दोन्हीही गायब झाल्याने व त्यांचा काहीच संपर्क होत नसल्याने हवालदिल झालेल्या यातील एका मोटार मालकाने गोवा पोलिसांकडे याबाबतची तक्रार केली. दरम्यान, याची कुणकुण शहापूर पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याला लागली. त्याने वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली. शोधमोहीम राबविल्यानंतर शहापूर पोलिसांना दोन मोटारी (जीए ०८ एम ७३४६, जीए ०३ वाय ९६५०) मिळाल्या. त्यांनी कागदपत्रांची शहानिशा व पूर्तता करून दोन्ही मोटारी मूळ मालकांच्या ताब्यात दिल्या. गाडी गहाणवट घेऊन लाखो रुपये देणाऱ्यांची अवस्था गाडी आणि पैसे दोन्हीही गेल्याने ‘तेलही गेले व तूपही गेले’ अशी झाली आहे.
संपादन- अर्चना बनगे