काय म्हणायचं याला! जप्त केलेली दारु केली गायब; कर्मचाऱ्यांवर गुन्हा

राजेश मोरे
Thursday, 25 February 2021

मद्याचे नमुने ताराराणी चौकातील वैज्ञानिक प्रयोग शाळेत (फॉरेन्सिक लॅब) तपासणीसाठी पाठवले जातात.

कोल्हापूर : कारवाईत जप्त करून तपासणीसाठी पाठवलेली ३१ हजारांहून अधिक किमतीची दारूच संगनमताने गायब केल्याप्रकरणी न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेतील सात कर्मचाऱ्यांवर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. लॉकडाउन काळात हा धक्कादायक प्रकार घडला. यातील सहा जणांना अटक केली. याबाबतची फिर्याद खुद्द सहायक संचालकांनीच दिली.

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे ः चालक वसंत भानुदास गौंड (कसबा बावडा), वरिष्ठ सहायक अक्षयकुमार सखाराम भालेराव (न्यू शाहूपुरी), प्रयोगशाळा सहायक मिलिंद शामराव पोटे (इचलकरंजी), कंत्राटी कर्मचारी मारुती अंबादास भोसले (शाहूपुरी दुसरी गल्ली), राहुल पांडुरंग चिले (फुलेवाडी, चौथा बस स्टॉप), गणेश मारुती सपाटे (बुरूड गल्ली), विरूपाक्ष रामू पाटील (विचारेमाळ) अशी आहेत.

हेही वाचा - इचलकरंजीत अवैध जुगार व्यवसायावर मोठी कारवाई ; बड्या लोकांची नावे? -

राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांकडून बेकायदा मद्य जप्त केले जाते. मद्याचे नमुने ताराराणी चौकातील वैज्ञानिक प्रयोग शाळेत (फॉरेन्सिक लॅब) तपासणीसाठी पाठवले जातात. या प्रयोगशाळेत सहायक संचालक म्हणून प्रदीप गुजर कर्तव्य बजावतात. तर संशयित वसंत गौंड लक, वरिष्ठ सहायक अक्षयकुमार भालेवार, लॅब सहायक म्हणून मिलिंद पोटे तर मारुती भोसले, राहुल चिले, गणेश सपाटे व विरूपाक्ष पाटील कंत्राटी कर्मचारी आहेत. लॉकडाऊनमध्ये तपासणीस पाठविलेल्या मद्य साठ्याबाबत वरिष्ठांना शंका आली.

दरम्यान एप्रिल व मे २०२० या दोन महिन्यात तपासणीसाठी पाठवलेले ३१ हजार १७६ रुपयांच्या मद्याची सात संशयित कर्मचाऱ्यांनी परस्पर विल्हेवाट लावल्याची फिर्याद सहायक संचालक गुजर यांनी मंगळवारी रात्री उशिरा दिली. त्यानुसार संबधितांवर गुन्हा दाखल केला. प्रयोगशाळेत जप्त केलेल्या दारूची गायब झाल्याने पोलिसही चक्रावून गेले. पोलिसांनी यातील गौड, भालेराव, भोसले, चिले, सपाटे व पाटील यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने तीन दिवस कोठडी सुनावली. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड व उपनिरीक्षक ए. बी. शिंदे करीत आहेत.

लॉकडाउनमध्ये मद्य फस्त? 

लॉकडाउन काळात मद्याची दुकाने बंद असल्याने ही दारू संशयितांनीच फस्त केली का? की विक्री केली? तसेच विल्हेवाट लावण्यापूर्वी मद्याची तपासणी केली की नाही, अशा प्रश्‍नांचा शोध पोलिस घेत आहेत.

हेही वाचा -  तुमचं फेसबुक प्रोफाइल कोण चेक करतयं का ? जाणून घ्या -

नातेवाइकांची गर्दी...

पोलिसांनी सहा संशयितांवर आज अटकेची कारवाई केली. सर्वांना दुपारी न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी संशयितांच्या नातेवाइकांनी शाहूपुरी पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime case in kolhapur theft of alcohol checking 7 employee arrested