esakal | दोन महिन्यानंतर घटना उघडकीस : उसाच्या शेतात सापडला मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

crime case in nipani Incident revealed after two months woman in Gorambe

निपाणीच्या आरोपींचा सहभाग

दोन महिन्यानंतर घटना उघडकीस : उसाच्या शेतात सापडला मृतदेह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निपाणी  : कौटुंबिक वादातून गोरंबे (ता. कागल) येथील महिलेचा निपाणी येथे खून झाल्याची घटना तब्बल दोन महिन्यानंतर शुक्रवारी ( १८) उघडकीस आली. गीता सागर शिरगावे (वय ३४, रा. गोरंबे, ता. कागल) असे या दुर्दैवी मृत्यू महिलेचे नाव आहे. या प्रकरणी निपाणी येथील दोन आरोपींना कागल पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू ठेवली आहे. या महिलेचा खून सुपारी घेऊन केल्याची चर्चा निपाणी शहरात सुरू आहे.


याबाबत घटनास्थळासह पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,

मृत गीता ही गोरंबे येथील असून तिचा विवाह कोगे (ता. करवीर) येथील एका युवकाशी अठरा वर्षांपूर्वी झाला होता. तिला एक मुलगा व एक मुलगी अशी अपत्ये आहेत. गीताचे बऱ्याच वर्षापासून गोरंबे येथील सागर शिरगावे याच्याशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे सहा महिन्यापूर्वी तिने कोगे येथे पती व मुलांना सोडून सागर याच्याशी नृसिंहवाडी येथे विवाह केला होता. त्यानंतर चार महिने गीता आणि सागर हे गोरंबे येथेच राहत होते.

मात्र सागर यांचे पहिले लग्न झाले असून त्यालाही अपत्ये आहेत. विवाहानंतर सागर आणि गीतामध्ये कौटुंबिक वादावरून सातत्याने भांडणे होत होती. त्यामुळे दोन महिन्यापूर्वी रात्रीच्या वेळी गीता बेपत्ता झाल्याची फिर्याद सागर याने कागल पोलिसात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे सुरू ठेवूही गीता अढळून आली नव्हती.

हेही वाचा- निष्काळजीपणा नडला  ; कोल्हापुरातील  या हॉस्पिटलवर दंडात्मक कारवाई -


दरम्यान, कागल पोलिसांना गीताचा मृतदेह निपाणी येथील एका शेतात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी निपाणीला भेट देऊन पाहणी केली असता जत्राट वेसवरील शहा कुटुंबीयांच्या उसाच्या शेतात गीताचा मृतदेह पुरल्याचे दिसून आले. त्यानुसार अधिक चौकशी केली असता निपाणी येथील बसव सर्कल परिसरातील हनुमान मंदिराच्या मागील  बाजूस वास्तव्यास असलेल्या ३२ आणि २२ वर्षीय युवकांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली. यावेळी त्यांनी आपणच गीताचा खून करून पुरल्याचे सांगितले. या दोघांनाही पोलिसांनी घटनास्थळी फिरवून अधिक माहिती जाणून घेतली. त्यांना खुनाची सुपारी कोणी आणि का दिली, याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.


जत्राट वेसवरील उसाच्या शेतात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पसरताच शहर आणि उपनगरातील नागरिकांनी परिसरात मोठी गर्दी केली होती. दुपारी एक वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत कागल आणि निपाणीतील बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी थांबून होते. तब्बल दोन महिन्यापूर्वी हा खून झाल्याने अधिक तपासासाठी वैद्यकीय पथकालाही पाचारण करण्यात आले होते. पोलिस आरोपींकडून अधिक माहिती जाणून घेत आहेत.

हेही वाचा-सिंघम स्टाईल कोल्हापूरकरांच्या ह्दयात कायम  :  कोल्हापूर राहणार नेहमी स्मरणात - ​


मोबाईलवरून घटना उघडकीस
मृत गीता हिच्याकडे असलेला मोबाईल आरोपींनी काढून घेतला होता. काही दिवस मोबाईल बंद ठेवून त्यानंतर त्यांनी शहरातील एका मोबाईल दुकानदाराला विक्री केली होती. या दुकानदाराने दुसऱ्या एका ग्राहकाला मोबाइलची विक्री केल्यानंतर मोबाईल सुरू करण्यात आला होता. त्याच्या कोडवरून कागल पोलिसांना संबंधित ग्राहक आणि आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आले.

खत विस्कटण्याचा बहाणा करून पाहणी

संबंधित आरोपींनी ज्या शेतात मृतदेह पुरला होता, त्याची पाहणी करण्यासाठी संबंधित शेतमालकाकडे जाऊन लॉकडाउन काळात काम नसल्याने आपणाला खत विस्कण्याचे काम देण्याची विनंती केली. त्यानुसार दोघा आरोपींनी खत विस्कटण्याचा बहाणा करून मृतदेह पुरला हे पाहणी करमाना उघडकीस आले आहे.


संपादन - अर्चना बनगे