मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर गुन्हे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

संचारबंदी आहे, घराबाहेर पडू नका...असे वारंवार आवाहन करूनही मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्यांचा शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी आज चांगलाच समाचार घेतला. गुडघे दुखी, नातेवाईकाला औषध देण्यासाठी गेलो होतो... अशा विविध कारणांचा आधार घेत खोटी नावे सांगणाऱ्या उच्च शिक्षितांचा त्यांनी पर्दाफाश केला. शहरातील पोलिस ठाण्यात आज 139 मॉर्निंग वॉकर्सवर गुन्हे दाखल केले. ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. 

कोल्हापूर : संचारबंदी आहे, घराबाहेर पडू नका...असे वारंवार आवाहन करूनही मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्यांचा शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी आज चांगलाच समाचार घेतला. गुडघे दुखी, नातेवाईकाला औषध देण्यासाठी गेलो होतो... अशा विविध कारणांचा आधार घेत खोटी नावे सांगणाऱ्या उच्च शिक्षितांचा त्यांनी पर्दाफाश केला. शहरातील पोलिस ठाण्यात आज 139 मॉर्निंग वॉकर्सवर गुन्हे दाखल केले. ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. 

मॉर्निंग वॉकर्सवर मंगळवार (ता. 7) पासून कारवाईची मोहीम पोलिसांनी हाती घेतली. आज पहाटेपासून शहरातील पोलिसांनी कारवाईस सुरवात केली. शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू झाली. सकाळी फिरायला बाहेर पडलेल्या उच्च शिक्षित, डॉक्‍टर्स, इंजिनिअर्स, व्यावसायिकांना पकडले. कोणाला गुडघे दुखीचा त्रास आहे, मधूमेहाचा त्रास आहे, डॉक्‍टरांनी दररोज फिरायला सांगितलेय, मी डॉक्‍टर आहे, फिरून थेट रुग्णालय सुरू करायला जातोय... मित्राच्या वडिलांना औषधे देण्यासाठी चाललोय... अशी कारणे सांगितले. तसेच काहींनी आपली ओळख लपविण्यासाठी खोटी नावेही सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा पर्दाफाश कट्टे यांनी केला. 

ही कारवाई महावीर गार्डन परिसर, धैर्यप्रसाद चौक, ताराबाई पार्क, रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, ताराराणी चौक, सायबर चौक, शिवाजी विद्यापीठ परिसर, रंकाळा, भवानी मंडप, हॉकी स्टेडियम, आयटीआय परिसर आदी भागात केली. यात शाहूपुरी पोलिस ठाण्याने 39, राजारामपुरी पोलिसांनी 24 आणि राजवाडा पोलिस ठाण्याने 50 जणांवर कारवाई करत संबंधितांवर गुन्हे दाखल केले. 

इचलकरंजीत 29 जणांवर गुन्हे... 
इचलकरंजी : सकाळी मॉर्निंग वॉकसाठी फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा दाखविण्यास सुरवात केली आहे. आज सकाळी 7 ते 8 या कालावधीत शहरातील विविध भागांत फिरणाऱ्या तब्बल 29 जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यामुळे निवांतपणे फिरणाऱ्यांना आता थेट पोलिस कोठडी गाठावी लागणार आहे. शहरात संचारबंदी असतानाही गेले काही दिवस अनेकजण विनाकारण व मॉर्निंग वॉकसाठी फिरत आहेत. आज सकाळी शहरातील शिवाजी पुतळा, जनता बॅंक, हवामहल बंगला, राजाराम स्टेडियम, शाहू पुतळा, महेश कॉलनी या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये पुढील 29 जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. 

वारंवार सूचना करूनही नागरिकांना गांभीर्य येत नाही. आता मॉर्निंग वॉकर्सवरील कारवाई अधिक कडक करून थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. 
- प्रेरणा कट्टे, शहर पोलिस उपअधीक्षक 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crimes on Morning Walkers