
हा अधिकार राज्यसरकारचा आहे. त्यात केंद्राने हस्तक्षेप करणे बरोबर नाही.
कोल्हापूर : सुरक्षा व्यवस्थेच्या मुद्द्यावरुन नारायण राणे यांनी राज्य सरकारला हिणवले होते. राज्य सरकारने सुरक्षा व्यवस्था कमी केली असली तरी केंद्राने सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे, त्यामुळे आता तरी राणेंना सुखाने झोप लागेल, असा चिमटा शरद पवार यांनी घेतला. कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यघटनेने राज्यसरकारांना कायदा आणि सुव्यवस्थेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार बहाल केला आहे. पण राज्यातल्या काही नेत्यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर केंद्र सरकारने हस्तक्षेप करत नेत्यांना सुरक्षा दिली. त्याबद्दल आमची तक्रार नाही. पण हा अधिकार राज्यसरकारचा आहे. त्यात केंद्राने हस्तक्षेप करणे बरोबर नाही. सुरक्षा देण्याची आवश्यकता कोणाला आहे? याचा अहवाल पोलिस राज्यसरकारला देत असतात. संभाव्य धोका ओळखूनच ही सुरक्षा दिली जाते. यामध्ये केंद्र सरकारने केलेला हस्तक्षेप चुकीचा आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - सर्किट हाउसवर रंगली खुमासदार टोलेबाजी; मुश्रीफ, सुप्रिया सुळेंसह कार्यकर्ते हास्यकल्लोळात -
राजकीय नेत्यांना पुरवली जाणारी सुरक्षा हा नेहमीच वादाचा विषय बनतो. आताही राज्य शासनाने देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, नारायण राणे, राज ठाकरे आदी नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली आहे. यावरून वादाला तोंड फुटले आहे. मात्र राज्य शासनाचा निर्णय डावलून तेथे केंद्र शासनाने हस्तक्षेप करणे ही पद्धत योग्य नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली. माझीही सुरक्षा व्यवस्था कमी केली होती, पण त्यावर मी काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - अजित दादांच्या मतावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया वाचा सविस्तर -
मुख्यमंत्री आज आगीच्या घटनास्थळाची पाहणी करणार
कोरोनावर लस निर्माण करणाऱ्या पुण्यातील सीरम इनस्टिट्यूटमध्ये आग लागली होती. या दुर्घटनेत 5 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सीरम संस्थेत लागलेल्या आगीवरून संशयाचा धूर निर्माण झाला आहे. यात घातपाताची कोणतीही शक्यता नाही, असं ठाम मत पवार यांनी व्यक्त केले.सीरम इन्स्ट्यिूट ही जगमान्य आहे. त्यांनी तयार केलेल्या लसीसंदर्भात तज्ञांनीच मते व्यक्त केली आहेत. त्यावर आपण म्हणणे मांडणे योग्य होणार नाही. कारण आपण तज्ञ नाही. पण या इनस्टिट्यूटच्या विश्वासार्हतेवर किंचतही शंका घेता येणार नाही.
येथे आग लागल्याचा प्रकारही चिंताजनक आहे. पण जिथे लसीचे उत्पादन होते. त्या जागेपासून आग लागलेली अंतर खूप लांब आहे. आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लांटला पुणे येथे प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संपादन - स्नेहल कदम