"बंटी किती चॅप्टर आहे ते दादांना विचारा": तीन नेत्यांची खुमासदार टोलेबाजी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

सर्किट हाउसवर रंगली खुमासदार टोलेबाजी; मुश्रीफ, सुप्रिया सुळेंसह कार्यकर्ते हास्यकल्लोळात

कोल्हापूर : सर्किट हाउस येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या वाहनांचा ताफा गेल्यावर मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात टोलेबाजी रंगली. या टोलेबाजीने कार्यकर्त्यांची हसून-हसून पुरेवाट झाली. या तिन्ही नेत्यांनी खेळीमेळीत केलेली ही टोलेबाजी मात्र पुढे बराच वेळ सर्किट हाउसवर चर्चेचा विषय ठरली.

जिल्हा परिषदेत उभारलेल्या माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण आज (ता. २२) शरद पवार यांच्या हस्ते होत आहे. यासाठी  पवार सपत्नीक रात्री येथे दाखल झाले. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर ते पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी बाहेर पडत असतानाच पालकमंत्री पाटील व खासदार सुळे यांचे सर्किट हाउसवर आगमन झाले. मुंबई येथून एकाच विमानाने पालकमंत्री पाटील व खासदार सुळे बेळगावात दाखल झाले. तेथून पालकमंत्री पाटील यांच्या वाहनातूनच त्या कोल्हापुरात सर्किट हाऊस येथे आल्या. दोघांचे आगमन होत असतानाच पवार पुढील दौऱ्यासाठी बाहेर आले.

पवार यांना निरोप दिल्यावर मंत्री मुश्रीफ व खासदार सुळे यांच्यात संवाद सुरू होता. पालकमंत्री पाटील एका बाजूला थांबून या दोघांचा संवाद ऐकत होते. यावर मंत्री पाटील यांच्याकडे पाहून खासदार सुळे यांनी सतेज पाटील यांना दूर का उभे आहात, गर्दीत का हरवला आहे, अशी विचारणा केली. यावर पालकमंत्री पाटील यांनी जवळ येऊन मुश्रीफ यांना नमस्कार करून मिश्‍कील हास्य करीत, हे आमचे मोठे भाऊ आहेत, असे सांगितले. यावर खासदार सुळे यांनी सतेज पाटील यांच्याकडे बोट दाखवत हे आमचे मुंबईपासूनचे केअरटेकर असल्याचे मुश्रीफ यांना सांगितले. हे ऐकताच मुश्रीफ यांनी, सतेज पाटील यांना उद्देशून ‘तो लय चॅप्टर आहे,’ असा टोला लगावला. मंत्री मुश्रीफ यांनी अनपेक्षितपणे लगावलेल्या टोल्याने सर्वत्र एकच हशा पिकला.

हेही वाचा- महाराष्ट्रावर सातत्याने केंद्र सरकार अन्याय करत आहे 

मंत्री मुश्रीफ यांच्या टोल्याचा धागा खासदार सुळे यांनी पकडत मुश्रीफ साहेबांनी तुमच्याबद्दल किती चांगल्या कॉम्प्लीमेंट दिल्या आहेत. त्यांच्या या वक्‍तव्यामुळे मला तुमचे व्यक्तिमत्त्व कळले, असा चिमटा सतेज पाटील यांना काढल्याने पुन्हा एकदा हशा पिकला. या हास्यातून सर्वजण सावरण्यापूर्वीच मंत्री मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा फटका लगावला. ‘बंटी किती चॅप्टर आहे, ते दादांना (अजितदादा) विचारा, म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी अधिक कळेल,’ असे सांगताच खासदार सुळे, पालकमंत्री पाटील यांच्यासह मुश्रीफ  कान देऊन ऐकत असलेल्या कार्यकर्त्यांनाही हसू आवरता आले नाही.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nationalist Congress Party President MP Sharad Pawar visit in kolhapur politics marathi news latest news